S M L

भाजप शिवसेनेसाठी अजूनही 'आशावादी' !

Sachin Salve | Updated On: Nov 20, 2014 09:45 PM IST

भाजप शिवसेनेसाठी अजूनही 'आशावादी' !

20 नोव्हेंबर : भाजपने सरकार जरी स्थापन केले असले तरी राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागला याचं शल्य भाजप नेत्यांना बोचत आहे. त्यामुळेच भाजप अजूनही सेनेसाठी आशावादी आहे. अनंत गीते जोवर केंद्रात आहेत तोवर शिवसेना आमचा मित्रपक्षच राहिल असं मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं तर शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे आणि नक्की मार्ग निघेल अशी आशा भाजपचे नेते राजीव प्रताप रुडींना वाटतेय. इतकंच नाही शिवसेना भाजपला पाठिंबा नक्की देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केलाय.

शिवसेना आणि भाजपची युती जागावाटपाच्या तिढ्यावरून तुटली पण सत्तेत सहभागावरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार हे जवळपास पक्क झालं होतं. पण अचानक कुठे तरी माशी शिंकली. त्यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी न होता विरोधी बाकावर बसली. पण सत्तेसाठी भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा लागला. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार तरले. पण आता हिवाळी अधिवेशन जवळ येत आहे. त्यामुळे दोन्ही गोटात पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. जोपर्यंत शिवसेनेचे नेते अनंत गीते एनडीएच्या मंत्रिमंडळात आहेत. तोपर्यंत सेना आणि भाजपच्या मैत्रीचा पूल कधीही सुरू होऊ शकतो. हे त्याचं उदाहरण आहे असं सुचक वक्तव्य महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलंय. तसंच जर अनंत गीते एनडीए सरकारमधून बाहेर पडले तर हा मैत्रीचा पूल कोसळला जाईल असा इशाराही खडसे यांनी दिला. तर दुसरीकडे सत्तेत सहभागाबद्दल शिवसेनेसोबत अजूनही चर्चा सुरू आहे, यातून नक्की मार्ग निघेल, अशी आशा भाजपचे नेते राजीव प्रताप रुडींना वाटतेय. इतकंच नाहीतर शिवसेना भाजपला पाठिंबा नक्की देईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केलाय. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 22 नोव्हेंबरला सर्वपक्षीय बैठक होणार आहे, त्यात शिवसेना पाठिंबा देईल ,असा दावा रुडी यांनी केलाय. विशेष म्हणजे सेनेतही सत्तेत सहभागावरुन संभ्रम कायम आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाअगोदर सेना-भाजप पुन्हा एकत्र येतील का हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2014 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close