S M L

जे झालं ते झालं आता नव्याने सुरूवात, राज लागले कामाला !

Sachin Salve | Updated On: Nov 29, 2014 07:19 PM IST

जे झालं ते झालं आता नव्याने सुरूवात, राज लागले कामाला !

29 नोव्हेंबर : ज्या गोष्टी झाल्यात त्या मी सोडून दिल्या आहेत. जे काही ऐकायचं होतं ते ऐकून घेतलंय. त्याच त्या चिखलात चिखल चिवडण्यात काही अर्थ नाही तो विषय आता बंद करुन टाकलाय. आता नव्याने कामाला सुरुवात केलीये अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. तसंच पक्षसंघटनेत फेरबदल होतील आणि प्रत्येक पदाला विशिष्ट जबाबदारी दिली जाईल, ती पाळावीच लागेल, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.

विधानसभेत दारुण पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:ला सावरून नव्याने कामाला लागले आहे. राज सध्या नाशिक दौर्‍यावर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेचे सरचिटणीस वसंत गीते आणि इतर पदाधिकार्‍यांनी राजीनामानाट्य घडवून आणले होते. त्यानंतर राज नाशिकमध्ये पोहचले. पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांना आधार देत नव्याने कामाला लागा असे आदेश दिले. आज दुसर्‍या दिवशी राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पराभवाचे शल्य राज यांनी बोलून दाखवले.

'ज्या गोष्टी झाल्यात त्या मी सोडून दिल्या आहेत. जे काही ऐकायचं होतं ते ऐकून घेतलंय. आता नव्याने कामाला सुरुवात केलीये. कारण त्याच त्या चिखलात चिखल चिवडण्यात काही अर्थ नाही तो विषय आता बंद करुन टाकला. आता या पुढे असं काही होऊ नये यासाठी काम सुरू आहे केलंय' अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

तसंच राज यांनी पक्षात फेरबदल करणार असल्याचं स्पष्ट केलं. राज म्हणतात, 'पक्षात नक्की फेरबदल होतील जी काही पदं आहे. त्या प्रत्येक पदाला आता चौकट आखली जाईल. जो कोणताही पदाधिकारी आहे त्यांचा काय कार्यक्रम असेल, त्याचं काम काय?, त्यासाठी प्रोटोकॉल काय असेल. त्या पदाधिकार्‍याने काय केलं पाहिजे. याची तपशील पुढच्या 10 दिवसांत प्रत्येकाच्या हातात पोहचले. त्यादरम्यान, काही बदल झाले ते होतील. त्यानंतर कोणतेही बदल होणार नाही. त्याबदलानुसारच सर्वांना काम करावे लागले. मला वाटलं म्हणून असं केलं पाहिजे हे या पुढे खपवून घेतलं जाणार नाही' असा इशाराही राज यांनी दिला. पराभवाची कारणीमिमांसा मी केली आहे. आता बोलणार नाही जे काही आहे ते तुम्हाला कृतीतून दिसेलच असंही राज म्हणाले.

यावेळी त्यांनी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विधानाचा समाचारही घेतला. मराठी शाळांमध्ये इंग्रजी उत्तम शिकवलं गेलं पाहिजे, ही मनसेची भूमिका आहेच. पण, इंग्रजी शाळा बंद करा, ही भूमिका योग्य नाही, असं म्हणत त्यांनी नेमाडेंच्या वक्तव्याला विरोध केला. दरम्यान, नाशिकला गार्डन सिटी म्हणून देशासमोर आणण्याचं आपलं ध्येय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2014 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close