S M L

मुंबईबाबत रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये, सेनेचा भाजपला टोला

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2014 07:38 PM IST

uddhav_on_bjp_6nov09 डिसेंबर : 'मुंबईचा विकास व्हावा हे तर खरेच, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये. मंगलकार्य करावयास जावे पण अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असा सल्लावजा टोला शिवसेनेनं आपल्या सत्तेत असलेल्या साथीदार अर्थात भाजपला लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे मुंबईसाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव मांडला याचा खरपूस समाचार आजच्या 'सामना' घेण्यात आलाय.

मुंबईच्या विकासासाठी सीईओ नेमण्याचा विचार फडणवीस सरकारने केल्यामुळे शिवसेनेनं कडाडून विरोध केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई वेगळी मांडण्याचा डाव असल्याची टीका करत सेनेनं एकच हल्लाबोल केला होता. हा वाद कसाबसा मिटल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. विशेष म्हणजे शिवसेना आता सत्तेत सहभागी झालीये पण तरीही सेनेनं आपल्या शैलीत मुख्यमंत्र्यांच्या प्रश्तावाचा सामनामधून समाचार घेतलाय. 'मुंबईचे भवितव्य पंतप्रधानांवर सोपवून मुख्यमंत्री परतले. मुंबईसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणं हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, असं मराठी माणसाचं मत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही तशी टीका केलीये. मुंबईच्या विकासाची सुत्रे दिल्लीच्या हातात ठेवणं याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाच असेल. पण राज्याच्या राजधानीच्या विकासाचे निर्णय दिल्लीवर सोपवून राज्य सरकार हात तर झटकू पाहत नाही ना असा संशय सेनेनं उपस्थित केलाय. तसंच पंतप्रधानांचं फक्त मुंबईवर लक्ष असणं हेही काही उचित नाही. मुंबई हे आजही जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र आहेच, पण मुंबईशिवाय महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांना जागतिक दर्जाचे शहर बनवता आले तर बरे होईल. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि विकास व औद्योगिक भरभराटीची सर्वात जास्त गरज विदर्भाला आहे. मराठवाड्याचा विचारसुद्धा करता आला असता व या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीवर झाला असता, पण मुंबईचे भवितव्य दिल्लीच्या हाती सोपवून मुख्यमंत्री परतले आहेत असा शेलक्या शब्दात टोलाही लगावण्यात आला.

मुंबईप्रमाणेच देशातील इतर मोठ्या शहरांनाही पंतप्रधानांच्या कृपाछत्राची गरज आहे. कारण देशातील इतर शहरांचा विकास झाला तरच मुंबई-ठाणेसारख्या शहरांवर आदळणारे लोंढे कमी होतील आणि मुंबईला मोकळा श्‍वास घेता येईल. दिल्ली, पाटणा, लखनौ, कोलकाता, भोपाळ अशा अनेक शहरांसाठीही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अशा विकास समित्या निर्माण झाल्या तर एकाच वेळी मुंबईसह अनेक शहरे जागतिक दर्जाची व्यावसायिक कें द्र बनू शकतील. फक्त मुंबईसाठीच पंतप्रधानांनी विशेष लक्ष दिले तर पंतप्रधानांवर पक्षपात आणि भेदभावाचा आरोप होईल. शिवाय देशाच्या विकासाचा समतोल बिघडेल, अशी टीका होईल हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारात घेतले पाहिजे असा डोसही मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. मुंबईचा विकास व्हावा, पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असे काही घडू नये. मंगलकार्य करावयास जावं आणि अचानक श्राद्ध घडावं हा धोका वाटत असल्यानेच मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून प्यावे असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2014 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close