S M L

तब्बल चार तासांत गिरगाव चौपाटीचा कायापलट!

Samruddha Bhambure | Updated On: Dec 12, 2014 11:05 AM IST

तब्बल चार तासांत गिरगाव चौपाटीचा कायापलट!

12  डिसेंबर :  पर्यटकांच्या वर्दळीमुळे अनेक ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या गिरगाव चौपाटीवर सफाईच्या नवीन प्रयोगाला अखेर यश येऊ लागले आहे. आधुनिक यंत्रामुळे सव्वा लाख चौरस मीटर चौपाटीचा परिसर अवघ्या चार तासांमध्ये स्वच्छ होत आहे.

गिरगाव चौपाटीवर लाखो देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ असते, त्यामुळे शहराची ओळख स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी या चौपाटीची सफाई आवश्यक आहे. परंतू कामगार आणि कचराकुंडयांची संख्या वाढवूनही चौपाटीची सफाई अवघड ठरत होती. पण आता गिरगाव चौपाटीवर फिरायला येणार्‍या पर्यटकांनी टाकलेला कचरा साफ करण्यासाठी 52 लाख रुपयांचे यंत्र घेण्यात आले आहे. पालिकेने सात वर्षांसाठी दिलेल्या स्वच्छता कंत्राटाचा हा भाग असल्याने पालिकेला त्याची वेगळी किंमत मोजावी लागलेली नाही. या यंत्रामुळे किनार्‍याचा सव्वा लाख चौरस मीटरचा परिसर चार तासांत स्वच्छ केला जातो.

अनेक वर्षांपासून किनार्‍यावर होत असलेला कचरा ही पालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे. गिरगाव चौपाटीवर दररोज तब्बल सहा टन कचरा गोळा केला जातो. चौपाटी स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्पर्न-इन्फ्रा जॉइंटव्हेंचर या कंपनीला सात वर्षांसाठी साडेतीन कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटाअंतर्गत किनारा स्वच्छ करण्यासाठी यंत्र, ते चालवण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली, कचरा कुंड्या आणि कचरा वाहून नेणारे वाहन घेणे अत्यावश्यक होते. त्यानुसार वर्षभराने गिरगाव चौपाटीसाठी नवीन यंत्र आणण्यात आलं आहे.

या यंत्राच्या खाली असणारी वैशिष्टयपूर्ण पाती वाळूच्या आतमध्ये सहा इंच जाऊन सूक्ष्म कचराही बाहेर काढतात. यंत्रामधील जाळीवरून कचरा व वाळू वेगळे होऊन कचरा कंटेनरमध्ये साठविला जातो, तर वाळू पुन्हा चौपाटीवर टाकली जाते. हे यंत्र तीन पाळ्यांमध्ये काम करणार असून यासाठी 12 कामगार तैनात ठेवले आहेत. संध्याकाळी चौपाटीवर मोठी वर्दळ असल्याने त्याचवेळी कचरा निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत जादा कामगार लावून चौपाटीची सफाई केली जाते. चौपाटीवर रोज तब्बल सहा टन कचरा गोळा होतो. चौपाटी स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 12, 2014 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close