S M L

केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Dec 15, 2014 04:12 PM IST

drought_in_maharashtra

15 डिसेंबर : राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केल्यानंतर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम राज्यात दाखल झाली आहे. दुष्काळ दौर्‍यावर असलेलं केंद्रीय पथक दोन ते तीन टीम करुन मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी करणार आहे. सध्या यातील एक पथक पैठणकडे तर दुसरे पथक जालन्याकडे रवाना झालं आहे. हे पथक राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आसून या अहवालानुसार, केंद्र सरकार मदतीचा निर्णय घेणार आहे. काल औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त आणि या पथकाची एक बैठक पार पडली.

हे पथक आज औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, वाशिम आणि अकोल्यामधील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहे. आज औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यातील मुरुमा गावातील कापसाच्या पिकाची पाहणी होईल, तसंच पैठणला जाऊन शेततळे आणि विहिरींची पाहणीही पथक करणार आहे. त्यानंतर ते पथक बीडच्या गेवराईमध्ये पोहोचेल. बीडमधल्या गेवराई तालुक्यातील मादळमोही, शिरुर तालुक्यातील सिंदफणामध्ये पाहणी करेल, त्यानंतर बीड शहरात बैठक होणार. तर समितीचे दुसरे पथक सटाणामार्गे जालना जिल्ह्यात पाहाणी करणार आहेत. जालन्यात सोमठाणामधल्या तलावाची पाहणी करुन, नंतर गोंदेगाव परिसरातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकाची दुरावस्था बघण्याचं काम हे पथक करेल. केंद्राचे दुष्काळी पथक उस्मानाबादचाही दौरा करणार आहे. जिल्ह्यातील उपळाई, कळंब, घोगरेवाडी, बोरगाव काळे गावांचा पाहणी हे पथक करेल. तसंच अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या मलकापूर आणि वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातही केंद्रीय पथकातर्फे दुष्काळाची पाहणी केली जाणार आहे.

दरम्यान, केंद्राकडं सुमारे 4 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची सरकारनं मागणी केली आहे. टीमच्या अहवालानंतर केंद्राची मदत जाहीर होईल. त्यामुळं राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज व्यतिरिक्त ही रक्कम असेल का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2014 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close