S M L

दुष्काळ पाहणी समिती काय 'उजेड' पाडणार?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 16, 2014 01:29 PM IST

दुष्काळ पाहणी समिती काय 'उजेड' पाडणार?

16 डिसेंबर : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौर्‍यावर आहे. दुष्काळामुळे शेतकर्‍यांवर काय परिस्थिती ओढवलीये, याची प्रत्यक्ष पाहणी करणं, शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणं हे त्यांचं काम आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यात काल दुष्काळी पथकानं पाहणीचं जे नाटक केलं, त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. दुष्काळी पथक घोगरेवाडीच्या तलावाची पाहणी करायला रात्री साडेसात वाजता पोहोचलं, पण त्या परिसरात वीज नसल्याने बॅटरी आणि गाड्यांच्या दिव्यांच्या उजेडात त्यांनी पाहणी केली आहे. अशा परिस्थितीत या पथकाच्या दौर्‍यानं राज्यात दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकर्‍यांना कितपत न्याय मिळणार, ही शंकाच आहे.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेलं पथक दुपारी तीनच्या सुमारास उस्मानाबादमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं. दुष्काळाने होरपळलेलेले शेतकरी केंद्रातील अधिकार्‍यांच्या दौर्‍याकडे नजर लावून बसलेले होते. अधिकारीही लवाजम्यासह हजर होते. पण केंद्राचे पथक मुळात पोहोचलं, ते संध्याकाळी साडेपाच वाजता उशिरानं ! त्यात राजकीय नेत्यांनी या पथकासमोर लुडबूड केल्याने शेतकरी आणि केंद्रीय पथकात संवादच होऊ शकला नाही. केंद्रातून आलेल्या समितीला योग्य माहिती देण्याचं काम अधिकार्‍यांचं होतं, पण त्यांना इंग्रजीतून नुकसानाची माहिती पोहोचवणं जमलंच नाही. कहर म्हणजे शेवटी घोगरेवाडीच्या तलावाची पाहणी करण्यासाठी हे पथक रात्री साडेसातच्या सुमारास पोहोचलं. रात्री उशीरा पथक आल्यानं अधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. तिथं वीजही नसल्याने शेवटी बॅटरीच्या आणि गाडीच्या दिव्यांच्या उजेडात पाहणीचा सोपस्कार आटपावा लागला. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्‍यांनी या नाटकी दौर्‍यावर आणि ढिसाळ नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2014 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close