S M L

तालिबानी पंचायत, अल्पवयीन मुलीचं दारुड्याशी लग्न लावण्याचा फर्मान

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 09:45 PM IST

jaat panchyat420 डिसेंबर : सांगली जिल्ह्यातल्या आष्टा इथं कोल्हाटी जात पंचायतीच्या पंचांच्या तालिबानी अत्याचाराचा नुमना पाहण्यास मिळाला. चक्क दारुड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करायला नकार देणार्‍या मोरे कुटुंबाला दंड ठोठावून बहिष्कृत केलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईवर सुद्धा बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारी नंतर , कोल्हाटी जात पंचायतीचा प्रमुख दिलीप जावळे याच्यासह पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली , सातारा , कोल्हापूर आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कोल्हाटी समाजावर जात पंचायतीचा मोठा पगडा आहे. मात्र गेली अनेक वर्षे या जात पंचायतीकडून लोकांचे शोषण केले जात आहे. मुलींचे जबरदस्तीने लग्न करून दिली जात आहेत. मारहाण करणे, दहशत माजवणे, जबरदस्तीने दंड वसूल करणे आणि कुटुंबाना वाळीत टाकणे असे अत्याचार केले जात आहेत. आतापर्यंत शेकडो कुटुंबावर अन्याय अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला मदत करणार्‍या आष्टा गावातील या कोल्हाटी समाजातील 600 लोकांना हि जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले आहे.

आष्टा गावात राहणार्‍या मोरे कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने किरण जावळे सोबत लग्न लावण्याचे फर्मान जात पंचायतीने काढले. मात्र किरण जावळे हा दारुडा असून मरणावस्थेत आहे. या मुलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न करण्यास मुलीच्या आईने नकार दिला. आपला आदेश मानला नसल्याने संतप्त झालेल्या जात पंचायतीचा म्होरक्या दिलीप जावळे यांच्यासह पंधरा जणांनी सुरुवातीला वीस हजार रुपये दंडाची मागणी केली. त्यानंतर कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी दिली. मोलमजुरी करणार्‍या या महिलेने उसनवारी करून दहा हजार रुपये जात पंचायतीच्या म्होरक्याला दिले. मात्र उर्वरित दहा हजार रुपयांच्या मोबदल्यात दिलीप जावळे याने सदर महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर जावळेसह त्याच्या पंधरा सहकार्‍यांनी महिलेला मारहाण केली. बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिला दिलीप जावळेने जबरदस्तीने ओढून नेले. मात्र ओरडा-ओरडा करून महिला त्यांच्या तावडीतून सुटून आली. त्यानंतर या महिलेने आष्टा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली. जात पंचायतीचा प्रमुख दिलीप जावळे याच्यावर महिलेशी गैरवर्तन करणे आणि त्याच्यासह अन्य पंधरा जणांवर खंडणी, मारहाण, दहशत माजवणे, शिवीगाळ करणे या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close