S M L

व्यापार्‍यांपुढे सरकार नरमले, आडत बंदीला तात्पुरती स्थगिती

Samruddha Bhambure | Updated On: Dec 22, 2014 05:44 PM IST

व्यापार्‍यांपुढे सरकार नरमले, आडत बंदीला तात्पुरती स्थगिती

22 डिसेंबर :  आडत बंदीविरोधात व्यापार्‍यांनी बंदचं हत्यार उपसल्याने राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी कृषी उत्पन्नबाजार समित्यांमध्ये वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली आहे.

तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने आडत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी दोन दिवसांपूर्वी आडत बंदीची घोषणा करून शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापार्‍यांनी विरोध दर्शवला होता. नाशिक आणि अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांनी आज बंदही पुकारला होता. व्यापार्‍यांच्या वाढत्या विरोधापुढे राज्य सरकारने आज (सोमवारी) नमती भूमिका घेतली. आडत बंदीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत असून 15 दिवस अडते आणि शेतकर्‍यांसोबत बैठक घेऊन, या परिस्थितीतून मार्ग काधू, अशी माहिती चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत दिली आहे.

आडत म्हणजे काय ?

 • आडते हे शेतकरी आणि व्यापार्‍यांमधले एजंट
 • माल विकल्यानंतर शेतकर्‍याला ताबडतोब पैसे हवे असतात, ते व्यापारी देत नाहीत
 • माल किरकोळ बाजारात विकल्यानंतरच व्यापारी पैसे देतात, यामध्ये 2-3 दिवस जातात
 • आडते शेतकर्‍यांना ताबडतोब पैसे देतात आणि ते 2-3 दिवसांनंतर व्यापार्‍यांकडून वसूल करतात
 • 2-3 दिवस पैसे आधी दिल्याचा मोबदला म्हणून आडते 3 ते 6 टक्के आडत (दलाली) शेतकर्‍यांकडून वसूल करतात
 • सरकारने आडत रद्द केली नसून ती आता शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनी द्यावी, असा आदेश काढलाय
 • आडत कपात टळल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत
 • पण आडतीचे आता जादा पैसे जाणार, यामुळे व्यापारी नाराज आहेत
 • आडत व्यवस्था धोक्यात आल्याचा आडत्यांनी कांगावा केलाय
 • वर्षभरात जवळपास 4 हजार कोटी रुपयांची आडत शेतकर्‍यांकडून वसूल होते
 • शेतमाल रोख रक्कम देऊन व्यापार्‍यांनी खरेदी केला, तर आडत पद्धत बंद होईल
 • पण, आडते आणि व्यापार्‍यांचं अनेक ठिकाणी साटंलोटं असल्यामुळे ही पद्धत कायम आहे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close