S M L

अखेर केळकर समिती अहवाल मांडला, पण चर्चा नाहीच !

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2014 05:48 PM IST

अखेर केळकर समिती अहवाल मांडला, पण चर्चा नाहीच !

kelkar_samiti23 डिसेंबर : प्रादेशिक असमतोल आणि अनुशेषावरचा बहुचर्चित डॉ.विजय केळकर समितीचा अहवाल राज्य सरकराने आज(मंगळवारी) विधिमंडळात मांडला पण चर्चा मात्र टाळली. अहवाल स्विकारायचा की नाही हे पुढच्या अधिवेशनात चर्चा करुन ठरवू असं उत्तर राज्य सरकारच्या वतीने वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिलं.

अखेर डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल आज अखेर विधानसभेत मांडण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अहवाल मांडला. उद्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपतंय. त्यामुळे या अहवालावर आता पुढच्या अधिवेशनात चर्चा होईल, असंही मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. या अहवालात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या रखडलेल्या विकासावर बोट ठेवण्यात आलंय. विदर्भाचं दरडोई उत्पन्न राज्यातल्या इतर भागापेक्षा 27 टक्के कमी आहे. विदर्भाची विकास तूट 39 टक्क्यांवर, तर मराठवाड्याची विकास तूट 37 टक्के असल्याचं अहवालात म्हटलंय. विदर्भ आणि मराठवाड्यात प्रादेशिक मंडळांची स्थापना करून नियंत्रण आणि नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलीय. तसंच या पुढे निधी वाटपात उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्याचा वाटा वाढवावा. या 750 पानी अहवालात समितीने 146 शिफारशी केल्या असून विभागवार लोकांची मतही अहवालात मांडली आहेत. ज्या भागात वीज निर्मिती होते तिथे कमी दराने वीज द्यावी , खाणकामाची रॉयल्टी त्याच भागासाठी वापरावी उद्योगांना विक्री करता दोन टक्क्यांची सवलत द्यावी तसंच प्रादेशिक अर्थसंकल्प राबवावा अशा महत्त्वाच्या शिफारशी करुन मागासलेल्या भागांचा अनुशेष दूर करण्याचा सरकरानं प्रयत्न करावा अशी सूचना समितीने केली आहे. एकूणच या अहवालाचा उहापोह केला तर सिंचन दूरवस्था, निधीतलं असमान वाटप आणि फसलेलं प्रादेशिक नियोजन या तीन प्रमुख बाबी विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत असं आढळून येतंय.

असा आहे केळकर समितीचा अहवाल

निधी वाटपाबाबत शिफारशी

- एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीमधला विदर्भ आणि मराठवाड्याचा हिस्सा वाढवा

- उर्वरीत महाराष्ट्र - 41.45 टक्के

- विदर्भ - 33.24 टक्के

- मराठवाडा - 25.31 टक्के

सिंचन निधीचे वाटप असे असावं

- उर्वरीत महाराष्ट्र - 43.15 टक्के

- विदर्भ - 35.26 टक्के

- मराठवाडा - 21.59 टक्के

विदर्भ आणि मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न घटले

- उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचे दरडोई उत्पन्न केवळ 27 टक्के आणि मराठवाड्याचे 40 टक्के

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2014 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close