S M L

सुखप्राप्तीसाठी दोन मुलांनीचं दिला आईचा बळी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2014 04:33 PM IST

सुखप्राप्तीसाठी दोन मुलांनीचं दिला आईचा बळी

30  डिसेंबर  : आपल्या इच्छा पूर्तीसाठी नरबळीच्या घटना आपण अनेक ऐकल्या असतील. पण, स्वत: ला सुख मिळावं म्हणून जन्मदात्या आईला संपवण्याचा धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये उघड झाला आहे. अघोरी विधीसाठी महिला मांत्रिकाच्या सल्ल्याने दोन मुलांनी आपल्याच आईची निर्घृण हत्या केल्याने सध्या नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावात ही घटना घडली आहे. टाके हर्ष गावाजवळ मांत्रिक महिलेने एका महिलेचा बळी दिल्याची कुणकुण श्रमजिवी संघटनेचे भगवान मधे यांना लागली होती. त्यांनी घोटी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्यावर तपास सुरू झाला. त्यावेळी मठ बांधण्याच्या नावाखाली मांत्रिक महिलेला सात बळी द्यावयाचे असून त्यापैकी एक बळी देण्यात आला, तर एका महिलेने सुटका करून घेतल्याने ती बचावल्याचे उघड झाले.

मोखाडा तालुक्यातील दांडवळ येथील काशिनाथ दोरे आणि गोविंद दोरे यांची बहीण टाके हर्ष येथे राहाते. आपणास सुख मिळत नसल्याची व्यथा या भावांनी बहिणीकडे मांडल्यावर तिने टाके हर्षमधील महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या भावांनी मांत्रिकाकडे धाव घेतल्यावर तिने तुमची आई आणि बहीण चेटकीण असल्याने सुख मिळत नसल्याचे कारण दिले. या दोघींचा बळी द्यावा लागेल असेही तिने सांगितले. दोघा भावांनी आई दुधाबाई दोरे आणि राही पिंगळे यांना मांत्रिकाकडे आणलं. मंदिर बांधण्यासाठी पूजा असल्याचा बनाव रचला आणि तिने दोघींना बेदम मारहाण केली. त्यातच दुधाबाईचा बळी देण्यात आला, तर राहीबाई आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाली.

पोलिसांनी सोमवारी राहीबाईकडे चौकशी केली. तिने घटनेची कबुली दिली. त्यानंतर घोटी पोलिसांनी याप्रकरणी काशिनाथ आणि गोविंद दोरे या भावांना आणि महिला मांत्रिकाला अटक केली आहे. याशिवाय या कृत्यात सामील असलेल्या इतर सात जणांनाही अटक झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2014 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close