S M L

तब्बल सात तासांनंतर म.रे. ट्रॅकवर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 2, 2015 07:51 PM IST

तब्बल सात तासांनंतर म.रे. ट्रॅकवर

 Train New02 जानेवारी : एक जानेवारीला अनेक ऑफिसेसमध्ये सुटी असते. त्यामुळे आज अनेक मुंबईकरांसाठी वर्षाचा पहिला दिवस होता. आणि पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने त्यांचा घात केला. पेंटाग्राफ तुटल्यामुळे आधी वाहतूक विस्कळीत झाली आणि मग दगडफेक झाल्यानंतर पूर्णपणे ठप्प झाली. त्यातच मोटरमननी काही काळ आंदोलन केल्यामुळे हार्बर लाईनही ठप्प झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळेला लाखो चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. बाहेरगावच्याही अनेक गाड्या अडकल्या. 7 तास हे नाट्य सुरू असताना. मुंबईमध्येच आलेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू मात्र अमित शहांसोबत पक्षाच्या कामांसाठी बैठक करत होते.

सकाळी 7च्या सुमाराला ठाकुर्ली स्टेशनजवळ स्लो ट्रॅकवरचा पेंटाग्राफ तुटला आणि कल्याण आणि डोंबिवलीमधली वाहतूक काही काळासाठी बंद झाली. सकाळी 8 वाजेपर्यंत स्लो गाड्या फास्ट गाड्यांच्या रुळावरून हळुहळू सुरू करायचा मध्य रेल्वेने प्रयत्न केला. पण वर्षाच्या पहिल्याच वर्किंग डेला. सकाळच्या तुडुंब गर्दीसमोर...हा प्रयत्न अर्थातच अपुरा पडला.स्टेशन्सवर गर्दी फुगत गेली आणि दिवा स्टेशनवर भडका उडाला. काही लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली.

खूप वेळानंतर आलेल्या एखाद्या लोकलला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे थांबवलं. सकाळी 9 नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. भडकलेल्या लोकांनी स्टेशनाबाहेर जाळपोळ करायला सुरुवात केली. 3 गाड्या जळून खाक झाल्या. यातली एक गाडी पोलिसांची होती. दिवा स्टेशनवर रेल रोको, दगडफेक आणि जाळपोळीमुळे अप आणि डाऊन मार्गावरची पूर्ण वाहतूक ठप्प झाली. मुंबईकडे आणि मुंबईबाहेर जाणार्‍या लोकल गाड्या जागच्या जागी अडकल्यामुळे पूर्ण सेंट्रल लाईन अर्ध्या तासात ठप्प झाली.. आणि भारताच्या आर्थिक राजधानीचा निम्मा भाग लुळा पडला.

तिकडे सीएसटी स्टेशनवर अधिकारी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतानाच.. तिथल्या मोटरमननी बंद पुकारला. मोटरमनला मारल्याचा निषेध करत त्यांनी उरलेली हार्बर लाईनही बंद पाडली. त्याचे पडसाद टिळक नगर स्टेशनवर उमटले. तिथे लोकांनी नवे एटीव्हीएम मशिन्स रुळांवर फेकले. हे सुरू असतानाच चिडलेल्या प्रवाशांनी डोंबिवली स्टेशनवरचं तिकीट घर फोडलं. पण रेल्वे प्रशासनाने मोटरमन संघटनेला सुरक्षारक्षक देण्याचं आश्‍वासन दिलं आणि काही वेळातच त्यांनी आंदोलन मागे घेतलं.

दुपारी 12 पर्यंत.. पोलिसांची अतिरिक्त कुमक दिवा स्टेशन परिसरात पाठवण्यात आली. परिस्थिती आता मुंबईतही बिघडू शकते हे लक्षात आल्यावर राज्य सरकार सतर्क झालं. 7 तासांनंतर मुंबईतच असलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनाही परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. मुंबई जळत असताना रेल्वे मंत्री मुंबईतच होते, पण पक्षाच्या कामासाठी अमित शहांसोबत बैठकीत बसले होते.

अखेरीस दुपारी एकच्या सुमाराला.. सीएसटीहून पहिली लोकल कल्याणच्या दिशेने प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडली. त्याच वेळी दिव्याहून पहिली लोकल मुंबईकडे निघाली. आता रेल्वे मंत्र्यांनी आजच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पेंटाग्राफ तुटणे, लोकल बंद होणे हे आता मध्ये रेल्वेच्या प्रवाशांसाठी नेहमीचंच झालंय. आता त्यांचा उद्रेक झाल्यावर तरी रेल्वे प्रशासन आणि मुंबईकर म्हणवणारे रेल्वे मंत्री दखल घेईल का, हे पहावं लागेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2015 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close