S M L

42 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 4, 2015 06:21 PM IST

42 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या

04 जानेवारी :  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या राजवटीत बरीच वर्षे एकाच खात्यात आपापल्या मर्जीतील सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) मोठे प्रशासकीय फेरबदल करत अशा अधिकार्‍यांना झटका देत एकाच दिवशी तब्बल 42 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

नव्या भाजप सरकारने राज्याच्या नोकरशाहीचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. दोन टप्प्यात झालेल्या आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांनतर प्रशासनाची नव्याने घडी बसवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शनिवारी केलेल्या 42 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांमधून नव्या सरकारने कर्तबगार आणि सक्षम अधिकार्‍यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

गृहविभागाची धुरा के.पी. बक्षी यांच्याकडे तर मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी प्रवीण परदेशी या सक्षम अधिकार्‍यांकडे सोपवली. तर आता झालेल्या बदल्यांच्या माध्यमातून महसूल विभागाची जबाबदारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे, नगरविकास खात्याची जबाबदारी नितीन करीर यांच्याकडे, उद्योग आणि ऊर्जा खात्यांची जबाबदारी मुकेश खुल्लर यांच्याकडे सोपवली आहे. राजकीय दृष्ट्या नागपूरचा विचार करता प्रशासकीय सेवेत कनिष्ठ असलेल्या श्रावण हर्डीकर यांची नागपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्याचवेळी गेल्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवणार्‍या ए.के. जैन, आशिष सिंह, अजय मेहता, एस. एस. संधू, देबाशिष चक्रवर्ती, राजगोपाल देवरा यासारख्या अधिकार्‍यांना कमी महत्त्वाच्या जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. फडणवीस सरकारच्या या धोरणामुळे अनेक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2015 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close