S M L

दिवा तोडफोड : 'सामना'तून सरकारला कानपिचक्या

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2015 02:13 PM IST

दिवा तोडफोड : 'सामना'तून सरकारला कानपिचक्या

05 जानेवारी :  शुक्रवारी रेल्वे यंत्रणा कोलमडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होऊन जो गोंधळ झाला त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनातून आपल्या सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेसच्या राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्याला आले, असा प्रश्न 'सामना'तील अग्रलेखातून विचारला आहे.

शुक्रवारी मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे दिवा-मुंब्रा स्टेशनवर अक्षरश: दंगल उसळली. अनेकांनी तोडफोड, लूटमार केली, मोटरमन्सनाही मारहाणी करण्यात आली. या सर्व प्रकाराबाबत अग्रलेखात नाराजी नोंदवण्यात आली आहे. मात्र ही हिंसक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत कोण असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेकांचे रोजगार, शाळा, कॉलेज, परीक्षा बुडाल्या, यासाठी रेल्वेचे प्रशासन जबाबदार आहे. मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा तिकीट मिळेल अशी योजना रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली, पण तिकीट घेऊनही फलाटावरून गाडी सुटणार नसेल तर लोकांच्या मनातील संतापाचा स्फोट हा होणारच, अशी टीकाही करण्यात आली आहे.

काँग्रेस राजवटीत उडालेला भडका हा जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये, असे सांगत असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार काय करणार आहे तेवढे सांगा, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी ठाकुर्ली स्टेशनमध्ये पेंटॉग्राफ तुटल्यामुळे दिवा स्टेशनमध्ये अक्षरशः दंगल उसळली. पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवल्यानंतर लगेचच दगडफेक सुरू झाली. त्याचा व्हिडीओ IBN लोकमतच्या हाती लागलाय. सुरुवातीला संतप्त जमाव रूळावर उतरला होता. त्यांना पोलिसांनी हटवलं, मग काही क्षण शांतता राहिली आणि मग मात्र, एकानं रेल्वेच्या दिशेनं दगड फेकला. यानंतर मग इतरही अनेक हातांनी दगड उचलले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close