S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीला नवे सदस्य नकोसे, नेतेही उदासीन !

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2015 08:30 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीला नवे सदस्य नकोसे, नेतेही उदासीन !

आशिष जाधव, मुंबई

08 जानेवारी : विधानसभेनंतर आता सर्वच पक्षांनी पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतलीये. पण नव्या दमाच्या 'जवानांची भरती' करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नाकीनऊ आले आहे. तर भाजपची मोहिम जोरात सुरू आहे. भाजपनं 1 कोटी सदस्यांचं उद्दिष्ट ठेवलंय. राष्ट्रवादीनं आधी 50 लाखांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. ते कमी करून 25 लाख केलंय. तर काँग्रेसला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसल्यानं 15 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणीची मुदत वाढवण्यात आलीये.

केंद्र आणि राज्यात निर्विवाद सत्ता, नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये चांगलं यश...अशा प्रकारे भाजपचे 'अच्छे दिन' सुरूच आहेत. आता देशभरात पक्ष संघटना मजबूत करण्यावर पक्षानं लक्ष केंद्रीत केलंय. त्यासाठी सदस्य नोंदणी सुरू करण्यात आलीये. देशात 10 कोटी तर राज्यात 1 कोटी असं लक्ष्य ठेवण्यात आलंय.

शरद पवार यांच्या अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात करताना राष्ट्रवादीने सदस्य नोंदणीचा धडाकेबाज कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासाठी 50 लाख सदस्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पण एकीकडे शरद पवारांचं आजारपण आणि दुसरीकडे अजित पवार आणि इतर वरीष्ठ नेत्यांची उदासीनता यांचा फटका पक्षाला बसतोय. पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यांकडून नोंदणी पुस्तकं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलीच नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीवर 50 लाखांचं उद्दिष्ट 25 लाखांपर्यंत खाली आणण्याची वेळ आलीये.

काँग्रेसच्या गोटातही फार काही उत्साह नाही. हंगामी प्रदेशाध्यक्ष आणि वरीष्ठ नेत्यांमधली मरगळ यामुळे काँग्रेसची परिस्थिती बिकट झालीये. सदस्य नोंदणी मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आणि सदस्य नोंदणीची मुदत दीड महिन्यानं वाढवावी लागली. सत्ता गेल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत मरगळ आलीये. फसलेली सदस्य नोंदणी मोहीम हे त्याचंच फळ आहे, कार्यकर्त्यांना आता त्याचा प्रत्यय येतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2015 08:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close