S M L

नायलॉन मांजावर बंदी, नागपूर खंडपीठाचा निर्णय

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2015 03:54 PM IST

नायलॉन मांजावर बंदी, नागपूर खंडपीठाचा निर्णय

12 जानेवारी : जीवघेण्या नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांनी लादलेली बंदी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानेही कायम ठेवली आहे. एक आठवड्याच्या आत संपूर्ण राज्यातून नायलॉन मांजा जप्त करा असे आदेशही हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. अनिल आगरे यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. नायलॉन मांजाच्या वापरावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले असले तरी नायलॉन मांजा विकणार्‍यांवरच कारवाई का केली जात नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मकरसंक्रांत जवळ आल्यावर नागपुरातल्या गल्लीबोळात पतंग उडवले जातात. गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर वाढला असून हा मांजा जीवघेणा ठरु लागला आहे. नायलॉन मांजामध्ये अडकून गेल्या वर्षी नागपूरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर सुमारे 800 पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले होते.

या पार्श्वभूमीवर नागपूरचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी 8 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश बजावला होता. पोलिसांच्या या आदेशाला पंतग आणि मांजा व्यावसायिकांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे आव्हान दिले होते. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने पोलिसांचा आदेश योग्य असल्याचे सांगत बंदी कायम ठेवली. त्यामुळे आता नागपूरमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास भादंविमधील कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2015 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close