S M L

तेलाचे दर गडगडले, भारतासाठी तुर्तास 'अच्छे दिन'

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2015 07:03 PM IST

तेलाचे दर गडगडले, भारतासाठी तुर्तास 'अच्छे दिन'

oil market34414 जानेवारी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराची घसरण सुरूच आहे. तेलाचे दर आणखी घसरत आज बॅरेलमागे 45 डॉलर्सच्या खाली आले आहे. गेल्या सहा वर्षांतला हा नीचांक आहे. तेलाचं उत्पादन कमी करायला ओपेक म्हणजेच तेल उत्पादक देशांनी नकार दिलाय. त्यामुळे तेलाचे दर आणखी गडगडले आहेत. तेलाचं उत्पादन कमी केल्यास ओपेक आपलं बाजारमूल्य गमावून बसेल आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्ध्यांना होईल, अशी भीती संयुक्त अरब अमिरातनं व्यक्त केलीय. त्यामुळे तेलाचे दर 40 डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तेलाच्या आयातदरात घट झाल्यामुळे भारतातील ग्राहकांना याचा काही प्रमाणार फायदा होईल. पण जागतिक बाजारपेठेत मंदी आली तर भारताच्या निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी प्रति बॅरल 120 डॉलर्सचा पल्ला गाढलेल्या तेलाच्या दरानं आता गटांगळी खात आता तो 45 डॉलर्सच्या आसपास आलाय. त्यामुळे जागतिक अर्थकारणाची समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे तेल निर्यात करणार्‍या देशांवर संकट आलंय. जगात तेलाचा सर्वाधिक वापर करणारा देश अशी ओळख असणार्‍या अमेरिकेनं स्वतःचे तेलसाठे विकसित करायला सुरुवात केलीय. शिवाय रशियाकडेही भरपूर तेल आहे. रशियाच्या निर्यातीत 70 टक्के वाटा तेलाचा आहे. आधी पश्चिम आशियाई देशांवर अवलंबून असलेले युरोपीय देश आता रशियाकडून तेल विकत घेतात. त्यामुळे ओपेकच्या तेलाला असलेली मागणी घटलीये. हे लक्षात घेऊन ओपेक देशांनी तेलाचं उत्पादन कमी केलं तर तेलाचे दर घसरणार नाहीत. पण ते त्याला तयार नाहीत. रशियानंही तेलाचे भाव स्थिर राखण्यासाठी तेलाचं उत्पादन कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. आम्ही तेलाचं उत्पादन कमी केलं, तर इतर निर्यातदार देश आणखी उत्पादन वाढवतील आणि त्यामुळे आमचे हक्काचे ग्राहक देश कमी होतील, असं या देशाचं म्हणणं आहे. दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएलामध्येही तेलाचं भरपूर उत्पादन होतं आणि या देशाची अर्थव्यवसस्थाही तेलाशी निगडीत आहे. त्यामुळे आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्हेनेझुएला चीनकडे बघतोय. पण मंदीचा फटका चीनलाही बसतोय. त्यामुळे तेलाच्या घसरत्या दरांचा त्यांना फायदा झाला तरी तो मर्यादित स्वरूपातच राहणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भारत एकूण वापरापैकी 75 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या घसरत्या दराचा आपल्याला अर्थातच फायदा व्हायला हवा. तेलाचे दर सध्याच्या कमी पातळीवर राहिले तर आपल्या देशात इंधनावर द्याव्या लागणार्‍या अनुदानात तब्बल दीडशे अब्ज रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. पण तेलाचे दर कमी राहणं हे जागतिक अर्थव्यवस्थेला फार काळ परवडणारं नाही. त्यामुळेच आता तेलाचे दर पुन्हा कधी आणि कितपत वर जातात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

तेलाचे दर का गडगडले?

- अमेरिकेनं देशांतर्गत तेल उत्पादनात दुप्पट वाढ केल्यानं जागतिक तेलउत्पादन वाढलं

- रशिया आणि ओपेकला शह देण्यासाठी अमेरिकेच्या तेल उत्पादनात वाढ

- चीन आणि युरोपीयन देशांची अर्थव्यवस्था ढासळल्यानं तेलाच्या मागणीत घट

- तेलाच्या किंमती 40 डॉलरच्या खाली जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

भारतावर काय परिणाम होणार?

- तेलाचे दर ढासळल्याचा भारताला काही प्रमाणात फायदा होणार

- तेलाच्या आयातदरात घट झाल्यानं ग्राहकांचा फायदा होणार

- पण जागतिक बाजारपेठेत मंदी आल्यानं भारताच्या निर्यातीला फटका बसण्याची शक्यता

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close