S M L

रेपो दरात पाव टक्क्याने कपात; गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Jan 15, 2015 02:02 PM IST

 रेपो दरात पाव टक्क्याने कपात; गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

15 जानेवारी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज (गुरुवारी) तात्काळ प्रभावाने रेपो दरामध्ये पाव टक्क्याची कपात करून आपल्या कर्जधारकांना संक्रांतीची भेट दिली आहे. मात्र, कॅश रिझर्व्ह रेशिओ (सीआरआर) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कपात करण्याची गरज असल्याची भूमिका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडली होती. मात्र अरुण जेटलींच्या दबावापुढे नमते न घेता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांडलेल्या तिमाही पतधोरणात रेपो रेटमध्ये कपात केली नव्हती. नववर्षात टप्प्याटप्प्यात रेपो रेटमध्ये घट होऊ शकते असे संकेतही रिझर्व बँकेने दिले होते.

गुरुवारी सकाळी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली. रेपो दरात पाव टक्क्याने कपात करण्यात आल्याने रेपो रेट आता 8 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांवर आले आहे तर रिव्हर्स रेपो रेट 7 टक्क्यांवरून 6.45 टक्के करण्यात आला आहे. आरबीआयच्या या सकारात्मक पावलाचे पडसाद शेअर बाजारावरही दिसले. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने 600 अंकांची उसळी घेतली. रेपो दरांमधील कपातीमुळे गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिव्हिडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वत:च्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.

सीआरआर म्हणजे काय?

सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला तिच्याकडे असलेल्या एकूण रकमेचा काही हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. या रकमेचं प्रमाण म्हणजेच सीआरआर होय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2015 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close