S M L

शिवसेना उतरणार दिल्लीच्या आखाड्यात

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2015 04:10 PM IST

uddhav_in_ekvira16 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापायला लागला असून या आखाड्यात आता शिवसेनाही उतरणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच दिल्लीत भाजपसोबत युती करायची की नाही याचा निर्णय झाला नाही असंही उद्धव यांनी सांगितलं. ते मुंबईत बोलत होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झालीये. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. आता या लढतीत शिवसेनाही उतरणार आहे. मागील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या मात्र बहुमताचा आकडा न गाठता आल्यामुळे भाजपचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. आपने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन 49 दिवस सरकार चालवलं. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या मुद्यावर सरकार बरखास्त केलं होतं. अखेर राष्ट्रपती राजवटीनंतर दिल्लीत पुन्हा निवडणुका होत आहे. भाजपने मोदी लाटेवर स्वार होत जोरदार मोर्चेबांधणी केलीये. तर दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंही दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत. काही जागांवर आम्ही लढण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र, याबद्दल अजून काहीच ठरलेलं नाही. याबद्दल लवकरच निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत भाजपसोबत युती करणार की, नाही याबद्दल विचारले असता अजून युतीसाठी भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं उद्धव यांनी सांगितलं. तसंच राजू शेट्टींच्या ऊसदर आंदोलनावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये. शिवसेना जरी सरकारमध्ये असली तरी शिवसेना शेतकर्‍यांची साथ सोडणार नाही. जिथे जिथे शेतकर्‍यांवर अत्याचार होत असतील त्याचा जाब आम्ही सरकारला विचारणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2015 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close