S M L

मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाचं वर्चस्व, हाफ मॅरेथॉनमध्ये कविता राऊतला सुवर्ण

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2015 02:37 PM IST

मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियाचं वर्चस्व, हाफ मॅरेथॉनमध्ये कविता राऊतला सुवर्ण

18  जानेवारी :  'रन मुंबई रन' असा नारा देत मुंबईकर आज रस्त्यावर उतरले. स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनला बोचर्‍या थंडीत सकाळी 5.40ला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 40 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत. सलग 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुंबई, महाराष्ट्रासह परदेशातील धावपटू सहभागी झाले होते. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही रस्त्यांवर उतरले होते. सीनिअर सिटीजनचा सहभाग देखील लक्ष वेधून घेणारा ठरला होता. मरीन ड्रायव्ह येथे फ्लॅशमॉबने या मॅरेथॉनचा उत्साह वाढवला.

हाफ मॅरेथॉनमधील खुल्या गटात भारताच्या इंद्रजित पटेल याने भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले तर दुसरा क्रमांक अथ्वा भगतने पटकावला. सावरपाडा एक्स्प्रेस अशी ओळख असलेल्या कविता राऊतने यंदाही महिलांच्या हॉफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक मिळवला तर उरणची सुप्रिया पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

फुल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा तेस्फे अबेराने बाजी मारली. त्यापाठोपाठ त्याचा सहकारी डेरेजेडेबिले याने दुसरा क्रमांक पटकावला तर केनियाच्या ल्यूक किबेटला तिसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. गेल्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या इव्हान्स रुटोला यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही. पुरुषांसोबतच्या महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्येही इथिओपियाच्या महिलांनी वर्चस्व गाजवले. इथिओपियाच्या मेकॅशने या मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पहिल्या 10 जणांमधील 8 महिला धावपटू या इथिओपियाच्या होत्या तर भारताच्या ललिता बाबर हिने या स्पर्धेत नववे स्थान पटकावले.

सेलिब्रिटी, राजकारणींची हजेरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे आजी-माजी मंत्रीदेखील उपस्थित झाले आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ मॅरेथॉनमध्ये दरवर्षी सहभागी होतात. यंदाही ते सकाळीच हजर झाले होते. त्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2015 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close