S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेमध्ये करणार चीन दौरा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2015 03:00 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेमध्ये करणार चीन दौरा

Inida- china

02 फेब्रुवारी :  पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेला अमेरिका दौरा आणि त्यानंतरचा ओबामा यांचा भारतदौरा, यामुळे भारत-अमेरिकेतील मैत्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सीमावाद आणि इतर मुद्द्यावर असलेली काहीशी तेढ दूर करून 'हिंदी-चिनी भाईचारा' वाढवण्याच्या हेतूने मोदी मे महिन्यात चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौर्‍याची पूर्वतयारी करण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या चीनच्या दौर्‍यावर असून, त्यांनी ही माहिती दिली. याआधी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग गेल्यावर्षा सप्टेंबरमध्ये भारताच्या दौर्‍यावर आले होते.

'भारत-चीन सीमा प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे,' असे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिले. चार दिवसांच्या दौर्‍याची सुरुवात करताना त्यांनी भारतीय आणि चीनमधील पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही देशांचे 'आशियाई शतक' (एशियन सेन्चुरी) स्वप्न साकार करण्यासाठी भारत-चीन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने स्वराज यांनी सहा कलमी कार्यक्रम सुचवला आहे.

एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर दोन्ही देशांचे संबंध पोहोचले आहेत. सीमेबरोबरच संरक्षण खात्यातील देवाणघेवाण वाढवण्यावर आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत, असे स्वराज म्हणाल्या. चीनने भारतीय कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे दरवाजे खुले करावेत, अशी अपेक्षा स्वराज यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच चिनी कंपन्यांना भारतात व्यापार करणे सुलभ करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कैलास-मानसरोवरच्या यात्रेला जाण्याची इच्छा असणार्‍या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कैलास-मानस यात्रेसाठी सिक्कीममार्गे तिबेटला जाणारा दुसरा मार्ग येत्या जूनपासून खुला करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे अधिक भक्तांना या यात्रेला जाणे शक्य होणार आहे. उभय देशामध्ये हा मार्ग खुला करण्यावर सहमती झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनी 'ट्विटर'द्वारे सांगितले आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रोटोकॉल तोडणार आहेत. एखादा परराष्ट्रमंत्री दौर्‍यावर आल्यानंतर त्याच्याशी परराष्ट्र मंत्र्यांनीच चर्चा करण्याची पद्धत आहे. मात्र, चीनचे अध्यक्ष ही पद्धत बाजूला ठेवून स्वराज यांची भेट घेणार आहेत. आज, सोमवारी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

चीनला घाबरण्याचं कारण नाही - ओबामा

भारत आणि अमेरिकेची मैत्री चीनविरोधात नाही, त्यामुळे चीनला घाबरण्याचं कारण नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलंय. दक्षिण चीन समुद्राबाबत फक्त संबंधित राष्ट्रांनीच चर्चा करावी, या चीनच्या प्रतिक्रियेनं मला आश्चर्य वाटलं, असंही ते म्हणाले. CNNचे फरीद झकारिया यांना ओबामांनी नवी दिल्लीत एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. सध्या सुषमा स्वराज चीनमध्ये आहेत, आणि मोदींच्या दौर्‍याच्या तयारीत त्या सहभागी होत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close