S M L

... तर गांधीजींनाही धक्का बसला असता - ओबामा

Samruddha Bhambure | Updated On: Feb 6, 2015 12:06 PM IST

obama speech4564

06 फेब्रुवारी :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर धक्कादायक विधान केले आहे. भारतात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे. महात्मा गांधीजी आज हयात असते, तर त्यांना खूप मोठा धक्का बसला असता, असे विधान बराक ओबामांनी केले आहे. गुरुवारी अमेरिकेमध्ये झालेल्या 'नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट' या कार्यक्रमात ओबामा बोलत होते.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. मात्र गेल्या काही वर्षात तिथे सगळ्या धर्मांचे लोक एकमेकांवर हल्ले करत आहेत, असेही ओबामा म्हणाले. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, भारतात ओबामांनी धार्मिक असहिष्णुतेवर केलंलं विधान कुठल्याही विशेष पक्षासंदर्भातलं नव्हते. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर बराक ओबामांनी धार्मिक सहनशीलतेवर जोर दिला होता.

'मी आणि मिशेल नुकतेच भारतातून परत आलो, तो अतिशय सुंदर आणि विविधतेने नटलेला असा देश आहे. मात्र गेल्या काही वर्षांत काही धर्माचे लोक फक्त वेगळा वारसा व श्रद्धेच्या आधारावर इतर धर्मांतील लोकांना लक्ष्य करत आहेत. देशाला उदार मतवादी बनवण्यात मोठा वाटा असणा-या महात्मा गांधींनाही हे सर्व पाहून धक्का बसला असता' असे ओबामा म्हणाले. गेल्या काही काळात झालेल्या हिंसेबद्दल बोलत असताना त्यांनी हे मत मांडले. मात्र ही हिंसा केवळ एका धर्मापुरती मर्यादित नव्हती असे सांगत त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नाव घेणे टाळले. ओबामांचे हे विधान भाजपाच्या विचारसरणीवरील अप्रत्यक्ष टीका असल्याचे मानले जात आहे.

यावेळी त्यांनी 'दलाई लामा' यांचीही स्तुती केली. 'तिबेटचे सर्वोच्च नेते असलेले दलाई लामा आपले चांगले मित्र' असल्याचे ते म्हणाले. मानवता आणि स्वातंत्र्य यांचा प्रचार करण्यासाठी दलाई लामा आम्हाला नेहमीच प्रेरित करतात, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या आधीही भारत दौर्‍यात दिल्लीत एका भाषणामध्ये, भारतात धर्मिक तेढ वाढतं असून त्याचा विकासावर परिणाम होतो असल्याचं वक्तव्य ओबामांनी केलं होतं. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close