S M L

'कोसला', 'हिंदू'कार आणि 'ज्ञानपीठ' नेमाडेंचा साहित्य प्रवास

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2015 04:04 PM IST

'कोसला', 'हिंदू'कार आणि 'ज्ञानपीठ' नेमाडेंचा साहित्य प्रवास

nemade44406 फेब्रुवारी : कोसलाकार भालचंद्र नेमाडेंचा साहित्यामधल्या सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान केलाय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत.एक नजर टाकुयात नेमाडेंच्या आजवरच्या साहित्यिक कामगिरीवर...

'कोसला'कार भालचंद्र नेमाडे...बंडखोर पण तितक्याच जागतिक स्तरावरच्या ताकदीचा साहित्यिक....आपल्या हरहुन्नरी स्वभावामुळे नेमाडे भलेही अनेकदा वादात सापडले असतील. पण त्यांच्या साहित्यिक कामगिरी मात्र वादादीत आहे, हे त्यांचे विरोधकही खुल्या दिल्यानं मान्य करतात. कोसला ही त्यांची पहिली कांदबरी. या कांदबरीने मराठी साहित्य विश्‍वात एक वादळ निर्माण केलं. पुण्यात शिकायला आलेल्या ग्रामीण तरुणावरच्या ही कादंबरी तरुणाईला पुरतं झपाटून टाकलं. तेव्हापासूनच नेमाडपंथी हा वेगळा वाचकवर्गच निर्माण झाला. नेमाडेंचा हाच चाहतावर्ग आजही कोणत्याही वादात ठामपणे त्यांच्या पाठिशी उभा राहतो. कोसलाच्याच धर्तीवर मग नेमाडेंनी बिढार, जरीला, झूल अशी भलीमोठी चांगदेव पासष्टीच वाचकांसमोर ठेवली. त्यातली 'वगैरे वगैरे...'ही भाषाशैली नेमाडपंथींमध्ये भलतीच लोकप्रिय आहे. ही कादंबरी सत्तरच्या दशकातली असली तरी त्याचं गारूड अनेक दशकं कायम राहणार आहे.

कोसलाकार नेमाडेंची अलीकडच्या काळातली ओळख आहे. 'हिंदू'कार म्हणून याच कादंबरीसाठी नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. हिंदू संस्कृतीला त्यांनी 'जगण्याची समृद्ध अडगळ' असं म्हटल्याने हिंदुत्ववाद्यांनी त्यांना बराचकाळ घेरण्याचा प्रयत्नही केला. पण नेमाडे यालाही पुरून उरले. याच हिंदूचा पुढचा खंडही लवकरच प्रकाशित होणार आहे.

साहित्य संमेलन, मराठी भाषा, संस्कृती यावरची नेमाडेंची भूमिका नेहमीच वादात सापडली. किंबहुना नेमाडे आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय. नेमाडे हे इंग्रजी भाषेचे प्राध्यापक असूनही देशीवादाचे आणि परंपरा वादाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या अगदी टोकाच्या भूमिकेवर नेहमीच टीकाही होते. पण नेमाडेंनी कुणासाठी म्हणून आपली मतं कधीच बदलली नाहीत. त्यांचा हाच बंडखोर वृत्तीचा ठामपणा नेमाडपंथींना भावतो.

चांगदेव पासष्टीच्या सिक्वेलसोबतच नेमाडेंचे हूल हा कथासंग्रह, तर मेलडी आणि देखणी हे दोन काव्यसंग्रहही आहेत. याशिवाय टीकास्वयंवर, नेटिव्हिजम, साहित्याची भाषा हे त्यांचे समीक्षात्मक लेखनही खूप गाजलं. नेमाडेंच्या साहित्यिक कामगिरीबद्दल त्यांना साहित्य अकादमी, पद्मश्री अशा पुरस्कारांनी सन्मानित केलंय. पण आता तर ज्ञानपीठ हा साहित्यातला सर्वोच्च सन्मान मिळाल्यामुळे नेमाडेंबरोबरच मराठी भाषेचाही डंका अटकेपार पोहोचलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close