S M L

मोदींवर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा-शेलार

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 06:44 PM IST

 मोदींवर टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा-शेलार

10 फेब्रुवारी : दिल्लीतल्या त्सुनामीनंतर राज्यात राजकीय भूकंपाचे हादरे बसले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करून भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं. त्यामुळे भाजपने आता थेट सेनेला निर्वाणीचा इशाराच दिलाय. मोदींवर टीका खपवून घेतली जाणार नाही जर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा कडक इशारा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं. पण त्याचवेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेतला भाजपवर हल्लाबोल केला. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीकरांनी दाखवून दिले, अशा शब्दात उद्धव यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं. उद्धव यांच्या टीकेमुळे साहजिकच भाजपच्या गोटात विरोधाचे सूर उमटले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेला धारेवर धरलं. 'मोदींवर टीका केलेली आम्ही सहन करणार नाही. टीका करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा आणि सत्तेतून बाहेर राहून टीका करा, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. ते एवढंच बोलून थांबले नाही, तर दिल्लीची चिंता करण्यापेक्षा उद्धव यांनी स्थानिक निवडणुकीची चिंता करावी असा टोलाही त्यांनी लगावला. जे मोदींवर टीका करतील त्यांनी सत्तेत आमच्यासोबत राहू नये हे भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे, जे लाटा निर्माण करतात ते त्सुनामी निर्माण करू शकतात आणि ज्यांच्याकडे लाटा-त्सुनामीही नाही त्यांनी बोलू नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही उद्धव ठाकरेंना सुनावले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close