S M L

भारताचा विजयी 'षटकार',सहाव्यांदा पाकला लोळवले

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2015 12:50 AM IST

भारताचा विजयी 'षटकार',सहाव्यांदा पाकला लोळवले

15 फेब्रुवारी : वर्ल्डकपमध्ये सलग सहा वेळा विजयाची परंपरा कायम राखत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवण्याचा पराक्रम धोणी ब्रिगेडने गाजवलाय. ऍडलेडमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगलेल्या 'मैदान-ए-जंग' सामन्यात 301 धावांचा पाठलाग करण्याऱ्या पाकचा भारताने 76 रन्सने धुव्वा उडवलाय. विराट कोहलीची शानदार शतकी खेळी आणि मोहम्मद सामीच्या भेदक गोलदांजीपुढे पाकने नांगी टाकली. भारताने या विजयासह 'यहा के हम सिंकदर' हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. भारताच्या विजयामुळे देशभरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. ठिकठिकाणी क्रिकेट रसिक फटाके फोडून आनंद साजरा करत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं तर दोन्ही देशांसाठी जीव की प्राण असाच सामना...आणि हा सामना पुन्हा एकदा भारताने जिंकलाय. दीडशे करोड भारतीयांनी 'याची देही याची डोळा' असा सामना आजचा दिवशी डोळ्यात साठवला. नुसता साठवला नाहीतर जणू टीम इंडियाचा एक खेळाडू म्हणूनच टीव्हीसमोर ठाण मांडून होता. वर्ल्डकप 2015 च्या या पहिल्या मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची सलामी सामन्याला गाठ पडली. ऍडलेडमध्ये भारताने मॅच तर जिंकली पण त्याअगोदर टॉसही जिंकला. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटिग करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन धोणीचा हा निर्णय टीमने सार्थ करून दाखवला. मॅचच्या सुरुवातील भारताला थोडे धक्के बसले. ओपनिंग जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन मोठ्या स्कोअरच्या हेतूने मैदानावर उतरली. पण आठव्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा 15 रन्सवर आऊट झाला. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहली बरोबर शिखर धवननं शानदार पार्टनरशीप रचली. धवनने हॉफ सेंच्युरी पूर्ण केली. त्याच्यापाठोपाठ विराटनेही हॉफ सेंच्युरी ठोकली. मात्र, शतकाकडे कूच करणार्‍या शिखर धवनची इनिंग 73 रन्स थांबली. 30 ओव्हरमध्ये शिखर धवन आऊट झाला. पण दुसरीकडे विराट कोहलीने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. आणि पुन्हा एकदा तुफान खेळी करत वन डे करिअरमधील 22वी सेंच्युरी ठोकली. विराटने 107 रन्स करून 45 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. कोहलीने 126 बॉल्समध्ये 8 फोर मारत 107 रन्स केले. त्यानंतर सुरेश रैनानेही कमालीची बॅटिंग करत शानदार हाफ सेंच्युरी ठोकली आणि स्कोरबोर्ड हलता ठेवला. तडाखेबाज खेळी करणार सुरेश रैना 74 धावांवर बाद झाला. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये झटपट धावांच्या नादात जडेजा, धोणी आणि रहाणेला बाद झाले. पाककडून सोहेल खानने हॅटट्रिक साधली. तर वाहब रियाझने 1 विकेट घेतली.

पाकची धूळधाण

301 धावांचा पाठलाग करण्यार्‍या पाकने सावध सुरुवात केली खरी पण चौथ्या ओव्हरमध्येच युसूफ खान 6 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर अहमद शहजाद आणि हॅरीस सोहेल यांनी पाकची इनिंग सावरली. पण ही पार्टनशीप काही काळाच मैदानावर टीकू शकली. 18 व्या ओव्हरमध्ये आर.अश्विनने हॅरिशला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर उमेश यादवने कमालीची गोलंदाजी करून पाकच्या गडाला हादरा दिला. 24 व्या ओव्हरमध्ये उमेशने अहमद शहजादला 47 तर शोयब मकसूदला भोपळाही न फोडता तंबूत पाठवलं. त्यानंतर कॅप्टन मिस्बाह उल हकने टीमची कमान सांभाळली. मिस्बाहने कॅप्टन इनिंग पेश करत सर्वाधिक 76 रन्स केले. मिस्बाहची झुंज एका बाजूने सुरू होती पण दुसरीकडे पाकचा डाव गडगडत चालला होता. कॅप्टन मिस्बाहची झुंज अपयशी ठरली. 46 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सामीने मिस्बाहला झेलबाद केलं. पाकच्या टीमने 47 व्या ओव्हरमध्ये 224 रन्सवर नांगी टाकली. भारताकडून मोहम्मद सामीने 9 ओव्हरमध्ये 34 रन्स देत 4 गडी टिपले. तर उमेश यादव, मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट मिळवल्यात. तर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येक एक-एक गडी बाद केले.

टीम इंडियाचा 'विजयी षटकार'

टीम इंडियाने या विजयासह वर्ल्डकपमध्ये विजयाचा रेकॉर्डही कायम राखला. 1992 पासून ते आजपर्यंत एकदाही पाकिस्तानला भारताच्या विरोधात विजयाची नोंद करता आली नाही. सलग सहाव्यांदा टीम इंडियाने पाकचा धुव्वा उडवत विजयाचा 'षटकार' लगावला. विशेष म्हणजे 1992मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पाकचा पराभव झाला होता. आणि आज 13 वर्षांनंतर पुन्हा ऑस्ट्रेलियामध्येच पाकला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

पुन्हा दिवाळी

'पाक जिंकणार की भारत जिंकणार ?' या चिंतेनं जीव डोळ्यात साचवून सकाळपासून टीव्हीसमोर तळ ठोकून बसलेला 'क्रिकेटवेडे' भारताच्या विजयाने जाम खूश झाले. अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकला लोळवल्यामुळे क्रिकेट रसिकांच्या उत्साहाला उधाण आलंय. देशभरात जणू दिवाळी साजरी होत आहे. ठिकठिकाणी क्रिकेट रसिक फटाके फोडून, 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' च्या जयघोष करत आनंद साजरा करत आहे. मोहम्मद शामीच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली असून आम्ही आज पुन्हा एकदा ईद साजरी करतोय अशी प्रतिक्रिया सामीच्या कुटुंबियांनी दिली. देशवासियांच्या या जलोषात पंतप्रधान नरेंद्र मोदींही सहभागी झाले. त्यांनी टीम इंडियाची पाठ थोपटली असून अभिनंदन केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close