S M L

महाराष्ट्रासाठी 'कही खुशी कही गम',नव्या रेल्वे मार्गाची घोषणा

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2015 10:49 PM IST

महाराष्ट्रासाठी 'कही खुशी कही गम',नव्या रेल्वे मार्गाची घोषणा

suresh prabhu_mahrashtra26 फेब्रुवारी : तब्बल 16 वर्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्रिपदी सुरेश प्रभू यांच्या रुपाने मराठी 'माणूस' लाभलाय. त्यामुळे साहजिक महाराष्ट्रासाठी काय घोषणा करता याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष दिल्लीकडे लागलं होतं.   महाराष्ट्रासाठी घोषणाचा पाऊस पाडण्यात आलाय. पुणे- लोणावळा दरम्यान तिसर्‍या लाईनसाठी मान्यता देण्यात आली असून 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तर पुणे-मिरज-लोंडा या दुहेरी रेल्वेमार्गासाठी 4,670 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तसंच मुंबईसाठी एमयुटीपी-3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चालू वर्षाचं रेल्वे बजेट सादर केलं. नव्या गाड्यांची घोषणा 'यार्डात' लावण्यात आलीये तर तिकिटांची दरवाढ न करता सोयीसुविधांची खैरात करण्यात आलीये. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळालाय. पण सुरेश प्रभू हे अस्सल महाराष्ट्रीयन नेते त्यामुळे आपल्या गावाला काय भेट देतात याकडे महाराष्ट्राची जनता नजर लावून होती. सुरेश प्रभू यांनी पुणे-लोणावळा दरम्यान तिसर्‍या लाईनसाठी मान्यता देण्यात आली अशी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.

पुणे-मिरज-लोंडा दरम्यान दुहेरी रेल्वेमार्गासाठी 4,670 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तर वर्धा-बल्लारशहा या तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून 630 कोटींची तरतूद करण्यात आलीये. राजनंदगाव-नागपूर या तिसर्‍या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आलीये. तर कराड-चिपळूण कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणी प्रकल्पासाठी 1200 कोटीची तरतूद करण्यात आलीये.

दरम्यान, या अगोदर, दिघी आणि रेवस बंदरांना रेल्वेने जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा प्रभू यांनी केलीये. विदर्भात वर्धा - नागपूर तिसरी रेल्वेलाईन टाकण्याची घोषणा केली खरी पण बांधा, वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम सुरू होणार आहे. तर मुंबईत एमयुटीपी -3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्वयंरोजगार गटाने तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवला जात असून यातून येणार्‍या काही काळात 50 हजार नोकर्‍या उपलब्ध होतील असा विश्वास प्रभूंनी व्यक्त केलाय.

मात्र, मराठवाड्याच्या वाट्याला यंदाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्यात. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड, परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यात रेल्वेचा विस्ताराचा प्रश्न आताही रखडला गेला त्याबद्दल कोणतीही घोषणा झाली नाही.

दिल्ली ते मुंबईचा प्रवास आणखी सुपरफास्ट करण्यात आलाय. दिल्ली-मुंबई प्रवास एका रात्रीत करता यावा यासाठी सध्या धावणार्‍या गाड्यांचा वेग वाढवून ताशी 160 ते 200 किलोमीटर करण्यात येणार आहे. आणि सरत शेवटी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेची पाहणी शेवटच्या टप्प्यात असून सर्वेक्षण या वर्षाच्या मध्यापर्यंत संपण्याची अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांतला अतिशय उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गुंतवणूक वाढल्यामुळे राज्यभरातले खितपत पडलेले रेल्वेट्रॅक पूर्ण होतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीये.

महाराष्ट्रासाठी नव्या रेल्वे मार्गाची घोषणा

1) पुणे- लोणावळा- तिसर्‍या लाईनसाठी मान्यता- 800 कोटी रुपयांची तरतूद

2) पुणे-मिरज-लोंडा - दुहेरी रेल्वेमार्ग- तरतूद- 4,670 कोटी रुपये

3) वर्धा-बल्लारशहा- तिसरा रेल्वे मार्ग- तरतूद- 630 कोटी रुपये

4) राजनंदगाव-नागपूर - तिसरा रेल्वे मार्ग- मंजूर

5) कराड-चिपळूण (कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणी प्रकल्प) 1200 कोटीची तरतूद

6) मुंबईसाठी MUTP - III

7) दिघी आणि रेवस बंदरांना रेल्वेने जोडणार

8) बांधा - वापरा - हस्तांतरित करा तत्त्वावर वर्धा - नागपूर तिसरी रेल्वेलाईन टाकणार

9) दिल्ली - मुंबई सुपफास्ट प्रवास, गाड्यांचा वेग वाढवून ताशी 160 ते 200 किलोमीटर करणार

10) मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वेची पाहणी शेवटच्या टप्प्यात

11) सर्वेक्षण या वर्षाच्या मध्यापर्यंत संपण्याची अपेक्षा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 10:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close