S M L

ठाण्यात रिक्षाचालकाच्या भीतीमुळे 2 मुलींनी चालत्या रिक्षातून मारली उडी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2015 03:53 PM IST

ठाण्यात रिक्षाचालकाच्या भीतीमुळे 2 मुलींनी चालत्या रिक्षातून मारली उडी

02 मार्च :  प्रवासा दरम्यान अश्लील हावभाव करणार्‍या रिक्षाचालकापासून आपला जीव वाचवण्यासाठी 2 मुलींनी धावत्या रिक्षेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी ठाण्यात घडली आहे.

रत्नागिरीत राहणार्‍या दोन मुली रविवारी ठाण्याच्या नौपाडा भागात फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी भिवंडी येथील आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी दोघींनी ठाण्यातून रिक्षा केली. रिक्षेत बसल्याच्या काही वेळानंतर रिक्षावाला मुलींकडे पाहून अश्लील हावभाव करु लागला. हा प्रकार लक्षात येताच दोनही मुलींनी रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली. पण रिक्षावाल्याने त्यांचं म्हणणं न ऐकता जोरात रिक्षा चालवायला सुरुवात केली.

शेवटी घाबरलेल्या या दोन्ही मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी कॅडबरी पुलाजवळ रिक्षेतून उडी मारली. यामुळे दोन्ही मुली जखमी झाल्या. त्याच रस्त्यावरून जाणार्‍या एका महिलेने जखमी अवस्थेत असलेल्या या मुलींना बघितले. यानंंतर त्या महिलेने दोन्ही मुलींना तात्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणातील आरोपी रिक्षावाला अद्यापही फरार आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत वर्तकनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रिक्षाचालकावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच टीम तयार केल्या असून लवकरच या आरोपीचं स्केच जारी करणार आहे. ही फार गंभीर घटना असून लवकरच आम्ही आरोपी गजाआड करू असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

यापूर्वी स्वप्नाली लाड या मुलीनेही रिक्षावाल्यापासून जीव वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली होती. दरम्यान, ठाण्यात अपहरणाच्या प्रयत्नाची दुसरी घटना घडल्याने सर्व ठाणेकर चिंतेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2015 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close