S M L

विधान परिषदेत आज सभापतींविरोधात अविश्वास ठराव

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2015 11:14 AM IST

विधान परिषदेत आज सभापतींविरोधात अविश्वास ठराव

16 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज चर्चा करण्यात येणार आहे. भाजपाने राष्ट्रवादीला अनुकूल भूमिका घेतल्याने अविश्वास ठराव मंजूर होण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. सभापतींविरोधात अविश्वास ठरावावर मतदान होण्याची विधीमंडळ इतिहासातील पहिलीच घटना ठरणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली, पण त्यात कोणताच मार्ग निघाला नाही.

विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची सदस्यांची संख्या जास्त असल्याने सभापतीपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यासाठी विद्यमान सभापती शिवाजीराव देशमुख यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, यासाठीही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यात यश न आल्याने सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. हा ठराव मंजूर होण्यासाठी 40 मतांची आवश्यकता आहे. एकुण 78 सदस्यसंख्या असलेल्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 28 सदस्य आहते. त्यानंतर काँग्रेसचे 21, भाजपाचे 12, शिवसेनेचे 7, शेकाप, लोकभारती आणि पीपल्स रिपब्लीकनचा प्रत्येकी 1, तसेच अपक्षांचे 7 सदस्य आहेत. सध्या भाजपाने राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली असल्याने सभापतींविरोधातील अविश्वास ठराव मंजुर होण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेने काँग्रेसला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे या ठरावाच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

दरम्यान, अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याचा काँग्रेसचा निर्णय पक्का झाला आहे. रामराजे नाइक-निंबाळकर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित झाल्याचं समजतं आहे. उपसभापती पदासाठी भाजपा नेते पांडुरंग फुंडकर यांचे नाव आघाडीवर आहे. पण फुंडकर यांना उपसभापतीपेक्षा मंत्री होण्याची इच्छा असल्याने त्यांनी या पदाला नकार दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close