S M L

भाजप-राष्ट्रवादीत 'विश्वासा'ची युती, अविश्वास ठराव मंजूर

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2015 10:17 PM IST

भाजप-राष्ट्रवादीत 'विश्वासा'ची युती, अविश्वास ठराव मंजूर

16 मार्च :विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि तो जिंकलाही गेलाय. राष्ट्रवादीने शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव जिंकलाय. या ठरावासाठी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय. भाजपच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आता उघड झालीये. ठरावाच्या बाजूने 45 मतं पडली तर विरोधात 22 मतं पडलीये. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं या युतीचा निषेध नोंदवत मतदानाच्या वेळी तटस्थ राहिली. आता सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांचं नाव निश्चित झालंय. त्यांनी त्याबद्दल होकारही दिलाय. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीमुळे आता देशमुख यांना पायउतार व्हावे लागणार आहे.

विधान परिषद सर्वाधिक संख्याबळावर दावा करत राष्ट्रवादीने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडलाय. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांनी दुपारी ठराव सादर केला. ठराव मांडल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी एकच गोंधळ घातला. अविश्वास ठरावाच्या वेळी मतदानासाठी सर्व राजकीय पक्षांनी व्हीप जारी केलाय. मतदानावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश सर्व पक्षांनी दिले होते. विशेष म्हणजे,सभापतींविरोधात अविश्वास ठरावावर मतदान होण्याची विधिमंडळ इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अगोदर सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली, पण त्यात कोणताच मार्ग निघाला नाही. अखेर राष्ट्रवादीने मांडलेल्या ठरावावर अपेक्षेप्रमाणे गोंधळ उडाला. शिवसेना आणि भाजपमध्ये तर कलगीतुरा रंगला. भाजप आणि राष्ट्रवादीची युती कधी झाली हे कळलंच नाही असा टोला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लगावला. तर भाजपचे नेते गिरीश बापट यांनी सेनेला जशाच तसे उत्तर दिलंय. रामदास कदम यांना सेनेत काय चाललंय ते कळत नाही, तर इथं काय चाललंय, ते कसे कळेल, असा पलटवार बापट यांनी केला. अखेर विधानपरिषदेत राष्ट्रवादीची संख्या 28 असून त्यांना भाजपच्या 12 आमदारांनी पाठिंबा दिला. शेकाप 1 आणि 4 अपक्षांची मतंही राष्ट्रवादीला मिळालं. त्यामुळे एकूण 45 मतं राष्ट्रवादीच्या पारड्यात पडत ठराव जिंकला.

काँग्रेसमुक्त करण्यासाठी मदत घेणार -खडसे

काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी जिथे जिथे काँग्रेस विरोधकांची मदत लागेल तिथे मदत घेणार आणि देणार असं स्पष्ट मत भाजपचे नेते एकनाथ खडसे मांडलंय. तर शिवसेनेला फक्त वाद निर्माण करता येतो त्यापलीकडे ते काहीही करत नाही अशी टीका भाजप नेते आशीष शेलार यांनी केलीये. तर सभापतींविरोधात गरज नसताना हा ठराव मांडण्यात आलाय अशी प्रतिक्रिया सेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी दिली.

असं झालं मतदान

ठरावाच्या बाजूने 45 मतं

ठरावाच्या विरोधात 22 मतं(काँग्रेसकवाडे गट)

भाजपची 12 मते रा़ष्ट्रवादीला

शेकाप 1 आणि 4 अपक्षांची मतंही राष्ट्रवादीला

शिवसेनेचे 7 आमदार मात्र, तटस्थ राहिलेत

कोण कोणाच्या बाजूनं ?

ठरावाच्या बाजूनं-45

राष्ट्रवादी-28

भाजप -12

अपक्ष-4

शेकाप-1

एकूण-45

ठरावाच्या विरोधात -22

काँग्रेस 21

कवाडे गट-1

एकूण-22

तटस्थ-7

शिवसेना-7

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close