S M L

क्लार्ककडून वर्ल्डकपचा विजय फिल ह्युजेसला समर्पित

Samruddha Bhambure | Updated On: Mar 29, 2015 07:36 PM IST

क्लार्ककडून वर्ल्डकपचा विजय फिल ह्युजेसला समर्पित

29 मार्च : पाचव्यांदा वर्ल्डकप पटकावणार्‍या ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन मायकल क्लार्कने आजचा विजय फिलीप ह्यूजला समर्पित केला आहे. या वर्ल्डकपमध्ये आम्ही 16 खेळाडू घेऊन खेळलो, आज फिलीप असता तर आज तोदेखील आमच्यासोबत जल्लोष करत असता अशी भावनिक प्रतिक्रिया मायकल क्लार्कने दिली आहे.

न्यूझीलंडला नमवत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप 215 वर नाव कोरले. टीमला वर्ल्डकप मिळवून देत क्लार्कने वन डे मॅचे्‌सला अलविदा केला आहे. फायनल मॅचनंतर क्लार्कने भावूक प्रतिक्रिया दिली. या मॅचमध्ये क्लार्कने दंडावर एक बँड बांधला होता. या बँडविषयी विचारले असता क्लार्क म्हणाला, या बँडवर पी.एच असं लिहीलं आहे. यापुढे मी ऑस्ट्रेलियासाठी मैदानात उतरीन त्यावेळी हा बँड लावूनच खेळीन. आज फिलीप ह्यूज असता तर त्यानेदेखील विजयोत्सव साजरा केला असता. आजचा विजय मी फिलीपला समर्पित करतो असं क्लार्कनं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिलीप ह्यूजचा गेल्या वर्षी क्रिकेट मॅचदरम्यान मृत्यू झाला होता. सिडनीत सुरू असलेल्या स्पर्धेत फिलीपच्या डोक्याला चेंडू लागला होता. फिलीप ह्यूज हा क्लार्कचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जायचा. विजयानंतर आम्ही सर्वजण पार्टी करणार आहोत. या पार्टीत एक ड्रिंक आम्ही फिलीपसाठीही ठेवली आहे असं त्यानं नमूद केलंय.

क्लार्कने 74 वन डे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केलंय. यातील 50 सामन्यांमध्ये त्याने टीमला विजय मिळवून दिला. क्लार्कने 254 वन डे मॅचमध्ये 7,981 धावा केल्या असून यात 8 सेंच्यूरी आणि 58 हाफ सेंच्यूरीचा समावेश आहे. क्लार्क आता फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2015 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close