S M L

महाजन यांनी पिस्तुल बाळगण्यात काहीच गैर नाही - मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2015 07:11 PM IST

महाजन यांनी पिस्तुल बाळगण्यात काहीच गैर नाही - मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

30 मार्च : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मूकबधीर मुलांच्या कार्यक्रमात कमरेत पिस्तूल खोचून भाषण केल्याचा मुद्दा सोमवारी विधान सभेतही चांगलाच गाजला. मंत्र्यांनी शाळेत पिस्तूल नेल्याने मुलांवर काय परिणाम झाला असेल, असं म्हणत 'अशा' मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळा अशी मागणी अजित पवार यांनी केली. तर महाजन यांच्याकडे गेल्या 20 वर्षांपासून पिस्तूलीचा परवाना असून त्यांनी पिस्तूल बाळगण्यात काहीच गैर नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांचा बचाव केला.

गिरीश महाजन यांनी काल (रविवारी) जळगावमध्ये मूकबधिर मुलांसाठीच्या साहित्य वाटप कार्यक्रमात चक्क कमरेत पिस्तूल खोचून भाषण दिले होते. मंत्र्यांनी लहानमुलांसमोर पिस्तूल बाळगल्याने अनेकांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. महाराष्ट्राला बिहारच्या वाटेवर नेले जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

राज्याचे मंत्र्यांना पोलिसांवर विश्वास नाही का, राज्याची कायदा व सुव्यवस्था ऐवढी ढासळली की मंत्र्यांना पिस्तूल घेऊन फिरावं लागतंय असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. महाजन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सभागृहात निवेदन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीने लावून धरली.

विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण देत गिरीष महाजन यांची पाठराखण केली आहे. फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांच्याकडे गेल्या 20 वर्षांपासून पिस्तूलीचा परवाना आहे. वैयक्तिक पिस्तूल परवानाधारकाने त्याची पिस्तूल सदैव त्याच्यासोबत बाळगणे बंधनकारक असते. त्यामुळे महाजन यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाजन यांच्या पिस्तूलीचा काही भाग अनावधानाने दिसला आणि यासाठी त्यांना योग्य त्या सुचना देऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

आयबीएन लोकमतचे सवाल

  • कॅबिनेट मंत्र्यांना सरकारी सुरक्षाव्यवस्था असताना पिस्तुल बाळगण्याची गरज काय ?
  • सरकारी सुरक्षाव्यवस्थेवर मंत्रिमहोदयांचा विश्‍वास नाही काय ?
  • पिस्तुल बाळगण्याचा परवाना असला तरी ते बाळगण्याच्या संकेतांचा भंग झालाय का ?
  • गिरीश महाजन यांना एवढं असुरक्षित का वाटतंय ?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2015 07:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close