S M L

कोल्हापूरचा टोलचा तिढा सुटेना!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 10, 2015 05:14 PM IST

कोल्हापूरचा टोलचा तिढा सुटेना!

10  एप्रिल : राज्यातील 65 टोलनाके बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी कोल्हापूरमधील टोलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. कोल्हापूरमध्ये टोलवसूली हा ज्वलंत विषय बनला असून याविरोधात कोल्हापूरकर गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) राज्यातील टोलनाके बंद करण्याची घोषणा करत वाहनचालकांना दिलासा दिला. मात्र मुंबईचे एंट्री पॉईंटवरील आणि कोल्हापूरमधील टोलनाक्यांचा प्रश्न तीव्र रुप धारण करत आहे.

कोल्हापूरमधील टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. तर मुंबईच्या एंट्री पॉइंटवरील टोलनाक्यांविरोधातही नाराजी पसरली आहे. मात्र या दोन्ही शहरांच्या टोलनाक्यांवर राज्य सरकारला तोडगा काढता आलेला नाही.

कोल्हापूर टोलनाक्यासंदर्भात चंदकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती 31 मे पर्यंत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोल्हापूरकरांना टोलमधून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. तर मुंबईतील सहा प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यावर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुंबई एंट्री पॉईंटवरील टोलनाक्यांसदर्भात धोरण ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समिताला या मार्गावरील टोलनाक्यांचा आर्थिक आणि कायदेशीर अभ्यास करण्याचं काम देण्यात आलं आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर या टोलनाक्यावरील टोल रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ही घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका केली आहे. जे टोलनाके बंद केले जाणार आहेत त्याची यादी समोर आल्यानंतरच सत्य समोर येईल. जे टोलनाके बंद केले जाणार आहेत त्यांची मुदत संपलेली आहे की नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच ही टोलमुक्ती आहे की नाही, याचे उत्तर मिळेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2015 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close