S M L

मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे चितपट

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2015 01:40 PM IST

मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे चितपट

15  एप्रिल : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा दारूण पराभव करत शिवसेनेला आपला बालेकिल्ला राखण्यात यश आलं आहे. आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा 19 हजार मतांनी पराभव करत मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्याने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने थेट आपले ज्येष्ठ नेते नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत रंग भरला. तर एमआयएमने रहबर सिराज खान यांना उमेदवारी दिल्याने या तिरंगी निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

मातोश्रीच्या बालेकिल्ल्यात ही निवडणूक होत असल्याने शिवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची तर नारायण राणेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची बनली होती. या लढतीमध्ये शिवसेना यशस्वी ठरली असून तृप्ती सावंत यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. तृप्ती सावंत यांना 52, 711 मतं मिळाली; तर नारायण राणेंना 33,703 मतं मिळाली असून एमआयएमचे रहबर सिराज खान यांना 15,050 मतं मिळाली आहेत. दरम्यान, रेहबर यांचं डिपोझीट जप्त होण्याची नामुष्की एमआयएमवर ओढवली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2015 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close