S M L

वांद्र्यातील पराभवामागे काँग्रेसचं कारस्थान, नारायण राणेंचा 'प्रहार'

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2015 01:13 PM IST

वांद्र्यातील पराभवामागे काँग्रेसचं कारस्थान, नारायण राणेंचा 'प्रहार'

16  एप्रिल : वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभव हा माझा स्वत:चा पराभव असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काल (बुधवारी) म्हटलं होतं.पण आज (गुरूवारी) नारायण राणे संपादक असलेल्या 'प्रहार' या दैनिकाने वांद्र्यातील पराभवाचा ठपका काँग्रेसच्या कारस्थानी नेत्यांवर ठेवला आहे. 'नारायण राणे हे विधानसभेपर्यंत पोहोचू नयेत यासाठी रचण्यात आलेल्या कारस्थानात काँग्रेसमधील अनेक मंडळी निश्चितच असली पाहिजेत,' असा दावा 'प्रहार'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

'राणे लढले, काँग्रेस हरली' असं शीर्षक असलेल्या 'प्रहार' आजच्या अग्रलेखात राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. या लेखातून नारायण राणेंनी पराभवासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाच जबाबदार ठरवलं. 'राणेंसारखा आक्रमक आणि खंदा नेता विधानसभेत पोहोचू नये असं विरोधकांना वाटणं साहजिक आहे. पण यात स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही हेच वाटतं होतं. प्रचारफेरीच्या जीपमध्ये काँग्रेस एकत्र दिसत होता. पण काळोखात अनेकांनी अनेक उद्योग केलं,' असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. वांद्र्यातील पराभव हा नारायण राणेंचा नसून काँग्रेसचा आहे असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

तसंच, धोका असल्याचं माहीत असतानाही पोटनिवडणुकीत उतरलेल्या राणेंच्या धाडसाचं अग्रलेखातून कौतुक करण्यात आलं आहे. राणे उमेदवार असल्यामुळंच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस 33 हजार 703 मतं आपल्याकडे खेचू शकली. दुसरा कोणी उमेदवार असता तर त्याचा पालापाचोळा झाला असता,' असंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून नारायण राणेंचा रोख काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर होता याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close