S M L

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर सेंट्रल जेलला 'सरप्राईज व्हिजिट'

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2015 11:31 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर सेंट्रल जेलला 'सरप्राईज व्हिजिट'

20 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) सकाळी अचानक नागपूरच्या सेंट्रल जेलला भेट दिल्याने जेल प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, या जेलची पाहणी केल्यानंतर नाराजी व्यक्त करत जेलच्या कारभारात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नागपूरचं सेंट्रल जेल सध्या कैद्यांचं पलायन आणि जेलमध्ये कैद्यांना मिळणार्‍या सुख-सुविधा, तसंच जेलमधून मिळणारे मोबाईल्स, बॅटर्‍या आणि चार्जर, अशा विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या जेलमधून आत्तापर्यंत 100 हून अधिक मोबाईल्स सापडले आहेत. मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने आणि गृहखातंही त्यांच्याकडेच असल्याने या प्रकरणी विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी अचानक या कारागृहाला भेट दिली.

फडणवीस यांचं नागपूर एअरपोर्टवर आगमन झाल्यानंतर त्यांनी अचानक कारागृहाला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा थेट नागपूर सेंट्रल जेलकडे रवाना झाला. जेलला भेट दिल्यानंतर अनेक आक्षेपार्ह बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्या. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, जेल प्रशासनात आणि त्यांच्या कारभारात सुधारणा होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच नागपूर जेलमधून फरार झालेल्या पाच कैद्यांना मदत करणार्‍यांना अटक करण्यात आली आहे. फरार कैद्यांचा ठावठिकाणा लागला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने जेल प्रशासनाची एकच धवपळ झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close