S M L

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांना लाज वाटून उपयोग काय?- शिवसेना

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2015 10:40 AM IST

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांना लाज वाटून उपयोग काय?- शिवसेना

05 मे : शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर औषध सापडत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लाज वाटते, पण त्याचा उपयोग काय असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालं असलं तरी शेतकर्‍यांची दुर्दशा संपलेली नाही असं टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यावर टीका करण्यात आली आहे. आता शिवसेनेने शेतकर्‍यांच्या आत्महत्येवरून सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

शेतकरी कष्ट करत असला तरी त्याला अपेक्षीत फळ मिळत नाही. सध्या लाटेवर आणि हवेवर निवडणुका जिंकता येतात आणि मंत्री, मुख्यमंत्री होता येते. पण शेतकर्‍यांना अशी लाट किंवा हवा जीवदान देऊ शकत नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीला नवी उंची मिळेल असा आशावाद व्यक्त करतानाच शेतकर्‍यांच्या आत्महत्येने लाज वाटते असं विधान केलं होते. यावर सामनामधून टीका करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाही याची दक्षता घेणं हे सरकारचं कर्तव्य असतं. फक्त भाषणात लाज वाटून उपयोग नसून प्रत्यक्षात कृती करणं अधिक गरजेचं आहे असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचाही सामनातून समाचार घेण्यात आला आहे. विदर्भात राहुल गांधींनी दौरा केला, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी जाऊन चहा-पाणी केलं, ही तर सगळ्यात लाजिरवाणी बाब असून कालपर्यंत राज्यात आणि देशात आपलंच सरकार होतं, हे राहुल गांधी यांना बहुधा आठवत नसावं, असंही सामनातून म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2015 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close