S M L

सलमानला जामीन मिळणार की जेलमध्ये जाणार?

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 08:45 AM IST

INDIA-COURT-CRIME-BOLLYWOOD-VERDICT

08 मे : बॉलिवूडचा दंबग स्टार, भाईजान अर्थात सलमान खानसाठी कालची रात्र वैर्‍याची होती. कारण, आज (शुक्रवारी) सलमानला जामीन मिळणार की जेलमध्ये जाणार याची महत्वपूर्ण सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार आहे. त्यामुळे सलमान जामीनवर बाहेरच राहतो की जेलमध्ये जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

2002 साली मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून सलमानने वांद्र्यात फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून या प्रकरणाचा खटला सुरू होता. याचिकाकर्त्या आभा सिंग यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आणि खटल्याला वळण मिळालं. अखेर 13 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी अर्थात 6 मे रोजी मुंबई सत्रन्यायालयाने सलमानला या प्रकरणात दोषी ठरवलं. न्यायाधीश डी.डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

सलमानने दारू पिऊन गाडी चालवली हे कोर्टात सिद्ध झालं. कोर्टाने सलमान दोषी ठरवताच त्याला रडू कोसळलं. न्यायाधीश देशपांडे यांनी सलमानला पाच वर्षांची सक्तमंजुरीची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावलाय. सत्र न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देण्यासाठी सलमानने अगोदरच तयारी केली होती. त्यानुसार ताबडतोब सलमानच्या वकिलांनी मुंबई हायकोर्ट गाठलं. सलमानचे वकील हरीष साळवे यांनी हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं. पूर्ण ऑर्डर मिळाली नसल्यानं आम्हाला आणखी एक दिवस द्यावा असा युक्तीवाद हरीष साळवे यांनी केला.

तसंच निकालाची प्रत मिळाली नाही आणि सेशन्स कोर्टाने सलमान खानला कोर्टासमोर शरण व्हायला सांगितलं होतं. पण त्याची कुठलीही मुदत कोर्टाने आपल्या निकालात नमूद केली नव्हती. या दोन कारणांमुळे सलमानला जामीन मंजूर करण्यात आला. सलमान दोन दिवसांच्या जामिनावर बाहेर पडला खरा पण तुरुंगात जाण्याची टांगती तलवार त्याच्यावर कायम आहे. आता आज सलमानच्या जामिनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार असून सलमानला जामीन मिळतो की जेलमध्ये जातो हे पाहण्याचं ठरणार आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 08:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close