S M L

सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती, जेलवारी टळली

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 09:13 PM IST

सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती, जेलवारी टळली

08 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेवर स्थगिती दिली असून जामीन मंजूर केलाय. त्यामुळे सलमानची जेलवारी टळली असून सलमानची एकाप्रकारे घरवापसी झालीये. गेल्या दोन दिवसांपासून सलमानला बेल मिळणार की जेल याची उत्सुक्ता लागून होती. आज, मात्र हायकोर्टात सलमानच्या वकिलांनी युक्तिवाद करत बाजू लावून धरली. या खटल्यात याचिकाकर्त्यांचा हक्क अबाधित राहावा असं मत नोंदवत हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेवर स्थगिती दिली आणि 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सलमानला जामीन मिळाल्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केलाय.

28 सप्टेंबर 2002 साली सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तब्बल 13 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल अखेर लागलाय. दोन दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला या प्रकरणात दोषी ठरवलं होतं आणि 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला होता. या निकालाविरोधात सलमानने हायकोर्टात जामिनीसाठी धाव घेतली.

सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद

आज या जामिनीवर न्यायाधीश ठिपसे यांच्यासमोर सुनावणी झाली. सलमानचे वकिल अमित देसाई आणि श्रीकांत शिवदे यांनी जोरदार युक्तीवाद करून काही प्रश्न उपस्थित केले. ज्यादिवशीही घटना घडली ते अपघातचं ठिकाण आणि हॉटेल मॅरियट हे 7 ते 8 किमीच्या अंतरावर आहे. तिथे पोहोचायला त्यांना अर्धा तास लागला असेल तर मग गाडीचा वेग 90 प्रति किमी कसा असू शकतो ?, तो 40 असायला हवा. साक्षीदार रविंद्र पाटील यांची 2002 मध्ये एका वृत्तपत्रात आलेली मुलाखत ग्राह्य का धरली जात नाही , त्या मुलाखतीत त्याने गाडी अल्ताफ चालवत होता असं म्हटलंय. अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते असा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केलाय.

जामीन कशाला हवी ते सांगा?, कोर्टाची दिशाभूल करू नका !

वकिलांच्या या युक्तिवादावर न्यायाधीश ठिपसे यांनी वकिलांना चांगलेच खडसावले. कोर्टाची दिशाभूल करू नका, निकालाची प्रत मिळाली की नाही ते आधी सांगा. अंतरिम जामीनासाठी जे कारण दिलं होतं त्याचं काय झालं ?, जामीन कशाला हवी आणि शिक्षेवर स्थगिती कशाला पाहिजे अशा शब्दात न्या.ठिपसे यांनी सुनावले. त्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेतली. न्यायाधीश ठिपसे यांनी याचिकाकर्त्यांचा हक्क अबाधित राहावा. याचिका अजून प्रलंबित असल्यामुळे या खटल्यावर स्थगिती मिळावी असं मत न्यायाधीश ठिपसे व्यक्त केलं.

 शिक्षेवर सशर्त स्थगिती

सलमानला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आणि शिक्षेवर स्थगिती देण्यात आलीये. तसंच सलमानच्या शिक्षेवर सशर्त अटीवर जामीन देण्यात आलाय. सलमानला यापुढे देशातून बाहेर जाता येणार नाही. जर देशाबाहेर जायचं असेल तर त्याला कार्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे.परवानगी मागितल्यास कारण लक्षात घेऊनच त्याला मंजुरी मिळणार आहे. याअगोदरच सलमानने बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्ट जमा केलेला आहे. या खटल्यावर हायकोर्ट 15 जूनला पुढचे दिशानिर्देश देणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सलमान खान फुटपाथ प्रकरणाची सुनावणी सुरू होईल.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close