S M L

सलमानच्या भेटीवर शरद पवारांनी टोचले राजचे कान

Sachin Salve | Updated On: May 8, 2015 09:53 PM IST

सलमानच्या भेटीवर शरद पवारांनी टोचले राजचे कान

08 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी दोषी अभिनेता सलमान खानला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे वाद निर्माण झाला होता. यावादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे चांगलेच कान टोचले आहे. दोषी सलमानची भेट घेण्यासाठी इतका उत्साह दाखवण्याची गरज नव्हती असं परखड मत पवारांनी व्यक्त केलं. ते दापोलीत बोलत होते.

फुटपाथ अपघात प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमानने हायकोर्टात धाव घेऊन त्याच दिवशी दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळवला होता. जामीन मिळाल्यानंतर सलमानचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या वांद्र्यातील घरी गर्दी केली होती. त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथील घरी जाऊन भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या भेटीमुळे वाद निर्माण झाला होता. या भेटीचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या स्टाईलने समाचार घेतला. एकदा कोर्टाने एखाद्या आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर इतक्या तातडीने उत्साह दाखवण्याची गरज नव्हती अशी टीका पवारांनी केली. तसंच जर कुणाचे व्यक्तीगत संबंध असतील त्यावर आपण काय समजून सांगायचं असंही पवार म्हणाले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे सलमानची भेट घेण्यासाठी घरी गेले होते.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2015 08:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close