S M L

मुंबईतील अग्नीतांडवात 2 अधिकारी शहीद, 2 जखमी

Samruddha Bhambure | Updated On: May 10, 2015 02:22 PM IST

मुंबईतील अग्नीतांडवात 2 अधिकारी शहीद, 2 जखमी

10  मे : मुंबईत काळबादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला काल (शनिवारी) संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचावकार्यात अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहीद झाले. त्याचबरोबर आगीमध्ये होरपळल्यामुळे दोन अधिकार्‍यांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे आणि भायखळा अग्निशमन केंद्राचे स्टेशन अधिकारी महेंद्र देसाई हे दोन अधिकारी आगीत होरपळल्यामुळे मृत्युमुखी पडले.

काळबादेवीमधल्या 33, गोकुळ निवास इमारतीला ही आग लागली. तब्बल 11 तासांनंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आली. आग अटोक्यात आणण्यासाठी राणे आणि देसाई हे दोन्ही अधिकारी काम करत होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्या ढिगार्‍याखाली अग्निशमन दलाचे दोन अधिकारी अडकले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना जवळच्याच जी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान याच दुर्घटनेत सुनील नेसरीकर हे 40 टक्के तर, सुधीर अमीन हे 80 टक्के भाजले आहेत. त्यांना एरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काळबादेवीतील इमारतीमध्ये रहिवाशांची संख्या कमी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण मोडकळीला आलेल्या या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकार अग्नीशमन दल अधिकार्‍यांच्या पाठिशी आहे. मी त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो.तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी बीएमसी आयुक्तांना दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2015 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close