S M L

मंगोलिया भाग्यवान, अशीच मदत शेतकर्‍यांनाही द्यावी : शिवसेना

Sachin Salve | Updated On: May 20, 2015 11:48 AM IST

मंगोलिया भाग्यवान, अशीच मदत शेतकर्‍यांनाही द्यावी : शिवसेना

20 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर सध्या भरपूर टीका होतेय. त्यातच आता शिवसेनेनं दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातूनही पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल. मंगोलियाला 1 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर करुन भारताच्या आर्थिक ताकदीची चुणूक दाखवली आहे. हीच सढळता मोदींनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत दाखवली, जैतापूर प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल असा खोचक टोला सेनेनं मोदींना लगावलाय.

या अग्रलेखात पुढे लिहलंय, पंतप्रधान मोदींनी अत्यंत उदार अंत:करणाने मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली. यापूर्वी भूतान वगैरे राष्ट्रांनाही आमच्या पंतप्रधानांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. शेजारच्या लहान व गरीब राष्ट्रांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे, ती एक विदेश नीतीसुद्धा आहे. मंगोलियास एक अब्ज डॉलर्सचा खुराक कशासाठी? हिंदुस्थानचा रुपया डॉलर्सच्या तुलनेत साफ कोसळत असताना आणि जागतिक बँकेचे कर्ज आपल्यावर असताना मंगोलियाच्या बाबतीत अशी सावकारी दाखविण्याची गरज आहे काय? असा सवाल सेनेनं उपस्थित केला.

तसंच शेजारी राष्ट्रांना अधूनमधून पॉकेटमनी द्यावा लागतो. खासकरून लहान आणि विकसनशील राष्ट्रांना हिंदुस्थानसारख्या मोठ्या राष्ट्रांकडून ही अपेक्षा असते. आमचे पंतप्रधान बाहेर जातात तेव्हा अशा राष्ट्रांना सढळहस्ते मदत करीत असतात, पण हीच सढळता व सहृदयता आमच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍याच्या बाबतीत दाखवली आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरडल्या जाणार्‍या कोकणी जनतेच्या बाबतीत दाखवली तर बरेच होईल. पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पातळीवर धुमधडाका सुरू केला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. केंद्राच्या व महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी मिळून शेतकर्‍यांच्या आत्महत्या व रखडलेल्या मदतीचा प्रश्न तेवढा निकाली लावावा हीच हात जोडून प्रार्थना! अशा टोलाही लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2015 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close