S M L

जैतापूर प्रकल्प खूप पुढे गेलाय, आता माघार नाही- मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: May 25, 2015 06:14 PM IST

जैतापूर प्रकल्प खूप पुढे गेलाय, आता माघार नाही- मुख्यमंत्री

25 मे : जैतापूर प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हं आहे. जैतापूर प्रकल्प खूप पुढे गेला आहे. आता माघार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते सोलापुरात बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना जैतापूर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच असं ठणकावून सांगितलं.

शिवसेनेने आजच जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिका कायम असल्याचं जाहीर केल्यानंतर, काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणारच असं ठणकावून सांगितलं आहे.  म्हणाले, जैतापूर प्रकल्प रद्द करण्यासारखी आता स्थिती नाही. चार वर्षांपूर्वी कोणी विरोध केला असता, तर त्याचा विचार करता आला असता, मात्र, आता हा प्रकल्प रद्द करता येणार नाही. कोणी किती विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही वेळा पूर्वीच शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेची जैतापूरविरोधी भूमिका कायम असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांच्या या घोषणेच्या काही तासातच मुख्यमंत्र्यांनीही जैतापूर होणारच असल्याचं सांगितल्याने, सेना-भाजपमधील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close