S M L

मुंबईसह महाराष्ट्र चिंब भिजला...

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2015 02:08 PM IST

मुंबईसह महाराष्ट्र चिंब भिजला...

13 जून : तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं...असं काहीस मान्सूनबद्दल म्हणावं लागेल. प्रचंड उन्हाचा उकाडा, घामाच्या धारा आणि पाण्याची आस लावून बसलेले बळीराजा आता सुखावलाय. मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मान्सूनच्या पावसात चिंब भिजलाय. ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलीये. त्यातच शनिवारची सुट्टी आल्यामुळे पावसाची मज्जा लुटण्यासाठी पाऊसवेडे बाहेर पडले आहे.

येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईत सलग दुसर्‍या दिवशीही पाऊसानं हजेरी लावलीय. येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जवळपास मुंबईच्या सर्व भागांमध्ये पावसाला सुरूवात झालीय. उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. पण पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. वेस्टर्न एक्स्प्रेस आणि ईस्टर्न एक्स्प्रेसवरही वाहतूक सुरळीत सुरू आहे. पहाटेपासून मुंबई आणि परिसरात संततधार आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालीय. हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. दुसरीकडे, मोठ्या उकाड्यानंतर पाऊस आल्यानं मुंबईकर आनंदात आहेत. त्यातच वीकेंड असल्यानं वरळी सी फेसवर लोकांनी गर्दी केलीय. पाऊस आल्यानं समुद्रकिनार्‍यावर लोक पावसाचा आनंद लुटतायत.

शिर्डीत जोरदार पाऊस

शिर्डी आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राहाता-शिर्डी परिसरात दोन तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पेरणीयोग्य पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर साईबाबाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना पावसामुळे अडचणीचा सामना करावा लागला. अहमदनगर जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्यात आता कमी जास्त प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरू आणि डाळींब उत्पादकांना दिलासा आहे.

औरंगाबादेत मुसळधार

गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलीये. शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय.औरंगाबादसह जालना, बीड, लातूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलीये. मराठवाडा अगोदरच दुष्काळाच्या गर्तेत सापडलाय. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळालाय.

विदर्भही भिजला

विदर्भातही वरूणराजे कडाडून बरसले आहे. वाशिममध्ये पावसानं हजेरी लावलीय. वर्ध्यात काल वादळीवार्‍यासह पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागात काही वीजपुरवठा खंडीत झाला. वीजेचे खांब उन्मळून पडल्याने आज दिवसभर वीज पुरवठा बंद राहणार आहे.

कोकण अजूनही कोरडा

मान्सून राज्यभरात दाखल झाला पण अजूनही तळकोकणात मान्सून दाखल झालेला नाही. आज कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पाऊस झाला. पण आज सकाळपासून मात्र कोकणात विशेष पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2015 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close