S M L

मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर,'तुमच्याविरोधात चौकशी सुरू नाहीये'

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2015 08:46 PM IST

मुख्यमंत्र्यांचं पवारांना प्रत्युत्तर,'तुमच्याविरोधात चौकशी सुरू नाहीये'

18 जून : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ एसीबीच्या गळाला लागल्यामुळे आज पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जोरदार पाठराखण करत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची टीका टोलावून लावलीये. राज्यात तुमच्याविरोधात चौकशी सुरू नाहीये. ज्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे ती नियमानेच सुरू आहे असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत मुंबई, नाशिक आणि पुण्यात घरं-कार्यालयांवर 16 ठिकाणी छापे ठाकले. अजूनही चौकशी सुरू आहे. आज भुजबळांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांची पाठराखण केली. भुजबळांवर कारवाई सुडबुद्धीने करण्यात आलीये. आता माझ्यासह सर्व नेत्यांना कधी अटक करता याची आम्ही वाट पाहतोय अशी टीका शरद पवारांनी केली होती.

शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या विरोधात कोणताही चौकशी सुरू नाहीये. त्यांना कोणत्याही चौकशीसाठी बोलवण्याचा आज तरी विषय नाही असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय. तसंच छगन भुजबळ यांच्यावर जी कारवाई सुरू आहे. ती नियमांनुसारच सुरू आहे. एसीबी ही एक संस्था आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच कारवाई केलीये. आम्ही कुणाच्या विरोधातही सुडबुद्धी, आकसाने कारवाई करत नाहीये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

एसीबीचे चौकशी अधिकारी मीडियासमोर चौकशीचा तपशील जाणीवपूर्वक उघड करत आहेत. त्यामुळे भुजबळ आणि आमच्या पक्षाविषयी जनमानसात संभ्रम निर्माण होतोय. याला सुडबुद्धीनं केलेली किंवा हेतूपुस्सर केलेली कारवाई म्हणायचे नाहीतर काय म्हणायचं असा खडासवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणतात, मीडियाविरोधात आमचीही तक्रार आहे. मीडियाच आमच्यावर कित्येक वेळा प्रहार करते. आता आमचीही तक्रार असताना आम्ही मीडियाला हाताशी घेऊन कशी कारवाई करणार आता ठीक आहे त्यांचीही भावना असेल पण, आकसाने कारवाई केली नाहीये, नियमांनुसारच कारवाई करण्यात आलीये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

दरम्यान, भुजबळांचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा, अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी केलीय. तर 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पवारांना टोला दिलाय. 'ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांनी जेल मध्येे जावं' असं शेट्टी म्हणालेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2015 08:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close