S M L

स्पेशल रिपोर्ट : उद्धव आणि बाळासाहेबांची शिवसेना...

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2017 06:04 PM IST

स्पेशल रिपोर्ट : उद्धव आणि बाळासाहेबांची शिवसेना...

uddhav_thackeray--621x41419 जून : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता वयाच्या पन्नाशीला आलीय. 19 जून हा शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन...वाढत्या वयानुसार या संघटनेचे ताकदही बर्‍यापैकी वाढलीय...शिवसेना भाजपच्या मदतीने फक्त राज्यात नव्हे तर केंद्रातही सत्तेची फळं चाखतेय. पण आत्ताची शिवसेना खरंच बाळासाहेबांची राहिलीय का...तर उत्तर आपसूकच नाही...असं येतं..पाहुयात उद्धव आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवरचा हा विशेष वृत्तांत...

शिवसैनिकांनो, मी तुम्हाला सांभाळलं, तुम्ही मला सांभाळलंत...शिवसेनेशी इमान बाळगा....उद्धव आणि आदित्यला सांभाळा...शिवसेनेला सांभाळा....बाळासाहेबांचं हे अखेरचं आर्जव शिवसैनिकांनी आदेश म्हणून स्वीकारलं म्हणूनच त्यांच्या पश्चातही शिवसेना राज्यात एक खंभीरपणे पर्याय स्वतःच्या पायावर उभा आहे...कधी नव्हे ती भाजपच्या मदतीनं सत्तेचं सोपानही चढलीय...अगदी राजकीय अंकगणितामध्येच हिशेब मांडायचा झाला तर आजमितीला शिवसेना यशाच्या शिखरावर आहे.

कधी नव्हे शिवसेनेचे 18 खासदार दिल्लीत पोहोचलेत...राज्यातही भाजपशी दोन हात करून सेनेनं तब्बल 63 आमदार निवडून आणलेत...आणि याच संख्याबळाच्या जोरावर सेना आज भाजपच्या सोबतीनं सत्तेची फळं चाखतेय. पण, आजची शिवसेना खरंच बाळासाहेबांची राहिलीय का? तर उत्तर हो नक्कीच येणार नाही. कारण, अर्थातच दोन्ही नेतृत्वांमधल्या फरकाचं आहे. उद्धव हे बाळासाहेबांचे पुत्र असूनही या दोन्हींच्या स्वभावगुणांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.

शिवसेना साहेबांची अन् उद्धवची

बाळासाहेब आक्रमक तर उद्धव मवाळ

बाळासाहेबांची शिवसेना रांगडी तर उद्धवची 'कार्पोरेट'

बाळासाहेब हे शब्द प्रभू तर उद्धव मितभाषी

बाळासाहेब हे भावनाप्रधान तर उद्धव हे धोरणी राजकारणी

स्वभावानं बाळासाहेब दिलदार तर उद्धव काहीसे आत्मकेंद्री

 

वकृत्व साहेबांचे आणि उद्धवचे

वकृत्वाच्या बाबतीत या पितापुत्रामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब म्हणजे मुलुखमैदानी तोफ... तर आवाजाचा तो पिच उद्धव अजूनही गाठू शकले नाहीत. अर्थात प्रत्येकाची एक शैली असते म्हणा...पण, जुनेजाणते शिवसैनिक आजही बाळासाहेबांच्याच नॉस्टलजियात जगणं पसंत करतात.

राजकीय डावपेच उद्धवचे आणि साहेबांचे

राजकीय डावपेचांमध्येही बाळासाहेबांनी कधीच सत्तेच्या हिशेबांची तमा बाळगली नाही...पवारांसाठी तर त्यांनी मैत्रीखातर अनेकदा राजकीय घाटाही सहन केला...पण उद्धव मात्र बाळासाहेबांच्या याच जिवलग मित्राविरोधात दंड थोपटून उभे आहेत....मग ते एमसीएचं मैदान असो वा राजकीय आखाडा...थोडक्यात काय तर राजकीय डावपेच मांडताना उद्धव प्रत्येकवेळी सत्तेची गणितं मांडताना दिसतात. हल्ली त्यांना राजकीय बार्गेनिंगही छान जमतं...कदाचित म्हणूनच आजची उद्धवची शिवसेना सत्तेत असूनही विरोधकासारखी वागत असावी...

शिवसेना साहेबांची आणि उद्धवची...

बाळासाहेबांची सेना ही खरं तर रस्त्यावर वाढली...उद्धव ठाकरेंनी त्याच शिवसेनेला राजकीय पक्षाचं स्वरूप दिलं. संघटनात्मक पातळीवर सेनेची अगदी व्यावसायिक पद्धतीनं बांधणी केली. पक्ष संघटनेत आपणच सुप्रीमो राहू याची विशेष काळजी घेतली. त्यासाठी पक्षातल्या ज्येष्ठांचा वाईटपणाही स्वीकारला...नव्हे काहींना तर खड्यासारखं बाजूला केलं...आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या विश्वासातली माणसं नेमली...भले मग ते राजकीय क्षेत्राशी संबंधित का नसेनात...शिवसेनेला एक संघटित राजकीय म्हणून पुढे आणलं...

नेतृत्व बाळासाहेबांचं आणि उद्धवचं...

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खरं तर बाळासाहेब असतानाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं...अगदी 2003 सालच्या महाबळेश्वरच्या बैठकीतही जेव्हा उद्धव ठाकरेंना balasaheb and uddhav and rajकार्याध्यक्षपद म्हणून निवडण्यात आलं त्याक्षणीच अनेकांनी भुवया उंचावल्या...

पुत्रप्रेमापोटी बाळासाहेबांनी पुतण्या राजवर अन्याय केला असेही आरोप झाले. राज ठाकरेंनी पुढे जाऊन तोच मुद्दा उपस्थित करून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला...तेव्हाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वगुणांना दूषणं देण्यात आली.

नारायण राणेंनीही नेमका हाच आरोप करत बंडाचं निशाण फडकावलं...हे दोन्ही सेना बंडखोर नेते बाहेर पडताना शिवसेना बर्‍यापैकी डॅमेज झाली...पण, उद्धव ठाकरेंनी कुठेही डगमगून न जाता शिवसेनेला सांभाळलं...

अगदी मुंबईची गेल्यावेळची मनपा निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय झाल्यानंतरही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं...पण उद्धव ठाकरेंनी अख्खी मुंबई पिंजून काढत सेनेचा बालेकिल्ला राखला...आणि स्वतःला सिद्ध केलं...

शिवसेनेसमोरची आव्हानं...

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा अनेकदा कस लागला. पण, त्यांनी एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखं संघटनेला सांभाळलं...पण गेल्या विधानसभेत भाजपनं साथ सोडल्यानं शिवसेनेला स्वतःच्या ताकदीवर लढावं लागलं. उद्धव ठाकरे लढले देखील....

युतीतल्या मोठ्या भावाचं स्थान मात्र ते गमावून बसलेत...बालेकिल्ला मुंबईतही भाजपचे सेनेपेक्षा जास्त आमदार निवडून आलेत...आणि त्याच जोरावर भाजप आगामी मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं मनसुबे रचतेय..

.म्हणूनच भाजपनं विधानसभेसारखीच सेनेची साथ सोडली तर उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे...बघूया काय होतंय ते...पण तूर्तास शिवसेनेला सुवर्णमहोत्सवासाठी शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2015 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close