S M L

'छान किती दिसते फुलपाखरू...,''ब्लू मॉरमॉन' ला 'राज्य फुलपाखराचा' दर्जा

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2015 11:07 PM IST

'छान किती दिसते फुलपाखरू...,''ब्लू मॉरमॉन' ला 'राज्य फुलपाखराचा' दर्जा

22 जून : महाराष्ट्र शासनातर्फे 'ब्लू मॉरमॉन' या फुलपाखराच्या प्रजातीला 'राज्य फुलपाखराचा' दर्जा दिला गेला आहे. असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे. राज्याचा प्राणी म्हणून 'शेकरु' या प्राण्याला याआधीच दर्जा मिळाला आहे. तसंच राज्याचा पक्षी,राज्याचा वृक्ष,राज्याचं फूल याआधीच घोषित झालं आहे. पण राज्याचं फुलपाखरू घोषित होणं विशेष मानलं जात आहे.

निसर्गप्रेमीसाठी पक्ष्यांप्रमाणेच फुलपाखरेही आवडीचा व आकर्षणाचा विषय आहे. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्वपूर्ण घटक व वनस्पतीसमवेत परस्पर संबंध असलेले महत्वपुर्ण किटक आहे. राज्यात जवळपास 225 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झालेली असून देशाच्या एकूण संख्येच्या 15 टक्के फुलपाखरे राज्यात आढळतात. देशामध्ये कोणत्याही राज्याने राज्य फुलपाखरू घोषित केलेले नसून एकंदरीत फुलपाखरांकडे दुर्लक्षच झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.

फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमी यांच्यामार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार व्हावा अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या मान्यतेकरीता ठेवण्यात आला होता. आकाराने सर्वात मोठे असलेल्या 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखराखालोखाल 'ब्लू मॉरमॉन'फुलपाखराचा आकार असतो.

हे फुलपाखरु आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून हे फुलपाखरू मखमली काळया रंगाचे असतं आणि त्याच्या पंखावर निळया रंगाच्या चमकदार खुणा असतात.

तसंच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. विशेष म्हणजे हे फुलपाखरू फक्त श्रीलंका आणि महाराष्ट्रासकट दक्षिण भारतात आढळतात. केवळ महाराष्ट्र (पश्चिम घाट) दक्षिण भारत आणि पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सद्यस्थितीत सदर फुलपाखराचे आढळ विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्र पर्यंत नोंदविले गेले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 11:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close