S M L

डोक्यावर टेंगूळ आलं तरी मुख्यमंत्री, दमू नका !, सेनेनं उडवली खिल्ली

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2015 05:52 PM IST

uddhav and fadanvis_new27 जून : महाराष्ट्रात रोज एका मंत्र्यावर आरोप होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अजिबात दमछाक होणार नाही, हे आरोप करणार्‍यांनी पक्के ध्यानात ठेवावे. महाराष्ट्राला एक समर्थ मुख्यमंत्री मिळाला आहे, विदर्भाचा हा गडी यापैकी कोणत्याही प्रकरणात मातीला पाठ लावणार नाही अशा शेलक्या शब्दात शिवसेनेनं आज आपल्या मुखपत्र सामनातून खिल्ली उडवलीये. एवढंच नाहीतर मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढण्यासोबतच तावडेंनाही लक्ष्यं केलं गेलंय.

आजच्या अग्रलेखात शिवसेनेनं नेहमीप्रमाणे आपल्या शैैलीत भाजपवर निशाणा साधलाय. "भारतीय जनता पक्ष सतत नैतिकता, सदसद्विवेकबुद्धी, साधनशुचिता, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार या शब्दांवर अजिबात गंज चढू देत नाही. हे शब्द घासूनपुसून चकचकीत ठेवण्यासाठी ही मंडळी पराकाष्ठा करीत असतात. पण, महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ज्या गंभीर आरोपांचा भडिमार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची दमछाक होताना दिसत आहे. रोज एका मंत्र्यावर आरोप होत आहेत व मुख्यमंत्र्यांना त्यांचा बचाव करावा लागत आहे. फक्त वर्षभरातच हे फटाके कसे फुटू लागले, हा संशोधनाचा विषय आहे" असा टोला सेनेनं लगावलाय.

स्वच्छता व पाणीपुरवठा खात्याचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बनावट पदवी प्रकरणाने घोटाळ्यांच्या मुहूर्ताचा नारळ फुटला, पण नारळ इतका टणक की तो फुटताना कपच्या उडाल्या आणि सरकारच्या डोक्यावर टेंगूळ आले. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदवी प्रकरणाने वादळ निर्माण झाले ते अद्याप शमलेले नाही. तावडे यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली व तावडे यांचे काहीच चुकले नसल्याचा निर्वाळा देऊन ते मोकळे झाले. मुळात कागदी पदव्या आहेत तेच उत्तम राजशकट हाकू शकतात या भ्रमातून पुढार्‌यांनी बाहेर यायला हवे. विकत घेतलेल्या आहे बनावट पदव्यांनी गुणवत्तेत भर पडत नाही असा सल्लावजा टोलाही सेनेनं लगावला,

पंकजा मुंडे यांचे चिक्कीचे प्रकरण समोर आले. कोणत्याही निविदा वगैरे न मागवता साधारण दोन-अडीचशे कोटींचा हा व्यवहार झाला, पंकजाताई अडचणीत आल्या, पण पंकजा मुंडे यांच्या बचावासाठीही मुख्यमंत्री सरसावले आहेत. यापैकी विनोद तावडे व पंकजा मुंडे हे भविष्यातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते हे सत्य स्वीकारले तर या भानगडी बाहेर काढून दोघांनाही आताच जेरबंद करण्याचे राजकारण नक्कीच खेळले गेले आहे.

पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतके सक्षम आहेत की कितीही आरोप झाले, कोणी कितीही बोंबा ठोकल्या तरी मुख्यमंत्री न डरता, दमछाक होऊ न देता प्रत्येकाला वाचवल्याशिवाय राहणार नाहीत. विदर्भाचा हा गडी यापैकी कोणत्याही प्रकरणात मातीला पाठ लावणार नाही. नैतिकता, स्वच्छ व पारदर्शक कारभार तर घासूनपुसून पीतांबरीने चकचकीत ठेवायलाच हवा, पण कोणीही उठावे आणि काहीही आरोप करून मुख्यमंत्र्यांना घेरावे हे बरोबर नाही. राज्य सरकार हे नीती, न्याय व साधनशुचितेच्या मार्गावरूनच चालले आहे आणि मुख्यमंत्र्यांची अजिबात दमछाक होणार नाही, हे आरोप करणार्‍यानी पक्के ध्यानात ठेवावे. महाराष्ट्राला एक समर्थ मुख्यमंत्री मिळाला आहे असा सणसणीत टोलाही लगावलाय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close