S M L

तावडेंसाठी पाटील-मुनगंटीवार आले धावून !

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2015 02:52 PM IST

तावडेंसाठी पाटील-मुनगंटीवार आले धावून !

30 जून : पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळानंतर आता शिक्षणमंत्री विनोद तावडेंही कंत्राटाच्या वादात सापडलेत. पंकजा मुंडेंच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले होते. आताही फडणवीस सरकार पुन्हा एकदा एकजुटीने विनोद तावडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तावडेंवरील आरोप फेटाळून लावलेय. या पत्रकार परिषदेला विनोद तावडेंही उपस्थित होते. हा केवळ राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न आहे असं सांगत तिन्ही मंत्र्यांनी आरोपाचं तर खंडन केलंच पण, हे सरकारला बदनाम करण्याचं षड्यंत्र असल्याचा आरोपही केला.

शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी अग्निशमन यंत्र देण्याचं 191 कोटींचं कंत्राट काढण्यात आलं होतं. पण, विनोद तावडेंवर कंत्राट देण्यात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आलाय. नियमांचं पालन न करता 191 कोटींचं कंत्राट दिल्याचा गंभीर आरोप तावडेंवर करण्यात आलाय. या कंत्राटावर अर्थखात्यानंही आक्षेप घेतलाय. त्यामुळेच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनोद तावडेंवर करण्यात आलेल्या आरोपाचं खंडन केलंय.

तावडेंवर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहे. हे पुराव्याशिवाय नाहीये. हा केवळ राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण विभागानं जिल्हा परिषद शाळांतल्या साहित्य खरेदीच्या कंत्राटामध्ये काहीच अनियमितता झाली नाही, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. राज्यात दोन पद्धतीने काम होते, रेट कॉन्ट्रॅक्ट आणि ई टेंडरिंगने काम त्यामुळे सर्व काम ई टेंडरिंगने होत नाहीत. रेट कॉन्ट्रॅक्ट करताना वस्तू विकत घेतली जाईल की नाही याची शाश्वती नसते आणि वेळही निश्चित नसतो. त्यामुळे दहा वर्षाचा सर्वोच्च दर धरुन तो लावला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय असा खुलासाही मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच सरकारला बदनाम करण्याचं हे एक राजकीय षड्‌यंत्र आहे असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

मुनगंटीवार यांच्या खुलाशानंतर तावडेंनीही आपली बाजू मांडली. प्रत्यक्षात कंत्राटानुसार खरेदी झालीच नाही, असा दावा तावडे यांनी केला. सुप्रीम कोर्टाचा आदेश लागू करायचा असेल तर 191 कोटी आवश्यक आहे. मात्र, अर्थखात्याच्या मंजुरीशिवाय कुठचीही खरेदी करायची नव्हती. अर्थखात्यानं मागितलेलं स्पष्टीकरण शिक्षण विभागानं पुरवलंय, असंही तावडेंनी सांगितलं. तसंच यापुढे मंत्रिमंडळाचे प्रवक्ते म्हणून सुधीर मुनगंटीवारचं माहिती देतील असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकलं. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे एक-एक मंत्री वादाच्या भोवर्‍यात अडकत आहे. वरिष्ठांकडून पाठराखण तर होतच आहे पण सहकारी मंत्रीही आज पाठराखण करण्यासाठी धावून आल्याचं चित्र दिसलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2015 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close