S M L

कशासाठी पिकांसाठी, बळीराजा वाचवतोय तांब्याभर पाण्यानं पिकं !

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2015 04:20 PM IST

कशासाठी पिकांसाठी, बळीराजा वाचवतोय तांब्याभर पाण्यानं पिकं !

01 जुलै : बघता बघता जून महिना उलटला पण पावसामुळे राज्यभरात 'कही खुशी कही गम' अशीच अवस्था आहे. त्यामुळे भरपावसाळ्यात मराठवाड्यात 'पाणीबाणी'ची परिस्थिती उद्भवलीये. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय. पावसाने पाठ फिरवल्यानं मराठवाड्यातला शेतकरी चिंतातूर झालाय. मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. अक्षरश: पाणी विकत आणून तांब्या तांब्याने पाणी देऊन पिकं वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत आहे. जर लवकर पाऊस पडला नाहीतर ज्या पिकांना वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय ती पिकं डोळ्यासमोर जळता पाहण्याची वेळ ओढवणार आहे.

बीड जिल्ह्यात मागल्या 15 दिवसापासून पावसाचा एक थेंब देखील पडला नाही. त्यामुळे पहिल्या पावसात केलेली पेरणी आणि त्यानंतर झालेली उगवण हे करपून जाण्याच्या मार्गावर आहे. आलेलं पिक वाचवण्यासाठी शेतकरी विकतचं पाणी आणून तांब्या तांब्याने या पिकला पाणी घालतोय. तर अनेक भागात चक्क दुबार पेरणीच संकट शेतकर्‍यावर आलंय. बीडमध्ये आतापर्यंत 783.69 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय. त्यानंतर पावसानं चांगलीच ओढ दिली.

जिल्ह्यात मृग नक्षत्रात तीन दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर आजपर्यंत पाऊस नाही. मृग नक्षत्रात 50 टक्के पेरण्या झाल्या. पेरण्यानंतर आलेलं पिक आता पाण्याअभावी करपू लागलंय. पेरणीसाठी एकीकडे शेतकर्‍याने सावकाराच्या हातपाया पडून व्याजानं पैसे आणून पेरणी केली. आता शेतकर्‍यावर आलेलं पिक वाचवण्यासाठी पाणी विकत घेवून मजुरांच्या सहाय्यानं तांब्या तांब्यानं पिकाला घालायची वेळ आलीय.

परभणीकडे पावसाची पाठ

गेल्या दोन वर्षांपासून परभणी जिल्ह्यावर निसर्ग कोपल्याचंच दिसतंय. पूर्ण जून महिना संपला तरी जिल्ह्यात केवळ 76 मिमी एवढ्याच पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यात 33 टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मुग आदी पिकांची पेरणी केलीय. मात्र, या पेरण्या वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यानं जमिनीत ओलावाच राहिला नसून पेरणी केलेलं धान सुकून गेलंय. त्यामुळे आता जोरदार पावसाकडे शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले आहेत.

नांदेडमध्ये पिकं जळण्याची भीती

मृग नक्षत्राला हुलकावणी दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसानं जोरदार आगमन केलं होतं. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात बर्‍यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरण्या उरकून घेतल्या. पण गेल्या 9 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत सापडलाय. पावसाअभावी आता पिकं कोमेजू लागलंय. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाऊस झाला नाही, तर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे. सध्या पिकांना अंकुर फुटले आहेत, पिकं वर आली आहेत. पण, पावसाअभावी पिकं जळण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकं जळाली तर शेतकर्‍यांना हंगामाच्या सुरुवातीलाच दुबार पेरणी करावी लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास 70 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन ही पिकं महत्त्वाची आहेत.

जिल्ह्यात खरीपाच एकूण 7 लाख हेक्टर पैकी 4 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास 70 टक्के पेरण्या उरकल्यात. नांदेड जिल्ह्यात कापुस आणि सोयाबीन ही महत्वाची पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामात 2 लाख 20 हेक्टर क्षेत्रावर कापुस आणि 1 लाख 90 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. पिकाच्या सुरक्षेसाठी म्हणून शासकीय योजनेनुसार शेतकर्‍यांनी पिक विमा काढला. पण, संबंधित विमा कंपन्यादेखील शेतकर्‍यांना योग्य मोबदला देत नाहीत. असा शेतकर्‍यांना अनुभव आहे. हेक्टरी 9 हजारांचा विमा असला तरी पिकांचं नुकसान झाल्यावर मात्र त्यापैकी 10 ते 6 टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या हातात पडते. या पैशांमधून दुबार पेरणी शक्य नाही. तेव्हा शासकीय योजनावर शेतकर्‍यांना विश्वास नाही. अशात दुबार पेरणीची वेळ आलीच तर पैसा कुठून आणावा, हा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे आहे.

वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. यंदा उसनवारी करुन कशीबशी पेरणी शेतकर्‍यांनी उरकली. शासनाने कर्जाचे धोरण देखिल अजून ठरवले नाहीत. त्यातच पावसा अभावी आता दुबार पेरणीच संकट उभ ठाकल्याने बळीराजा चिंतेत सापडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close