S M L

हा घोटाळा नाहीच !, पंकजा मुंडेंचा 'खुलासा'नामा

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2015 06:30 PM IST

हा घोटाळा नाहीच !, पंकजा मुंडेंचा 'खुलासा'नामा

01 जुलै : चिक्की घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचं खंडन केलंय. मी एकाही रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही. आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत. जर काही चुकीचं आढळलं तर राजकारणातून बाहेर पडेन असा खुलासानामा पंकजा मुंडेंनी सादर केला. तसंच आपण पक्षात एकाकी नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आपल्यासोबत आहेत असंही पंकजांनी सांगितलं.

फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत नाही तेच पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटींचा गैरव्यवहार झाल्यामुळे एकच हादरा बसला. अंगणवाड्यांसाठी करण्यात आलेल्या खरेदीमध्ये 206 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पंकजा मुंडेंवर करण्यात आलाय. लंडनहून परतल्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाचं खंडन केलं आणि संपूर्ण खरेदीचा खुलासा केला. चिक्की खरेदी प्रकरणाबद्दल मीडियाने हा घोटाळा असल्याचं म्हटलंय. पण, हा फक्त शब्दांचा घोटाळा आहे. याला घोटाळा म्हणणं चुकीचं ठरेल. जे काही माझ्यावर आरोप झाले, त्याबद्दल वृत्तपत्रात बातम्या आल्या त्याचा मी 56 तास न झोपता अभ्यास केला. काही वृत्तपत्रांना रितसर खुलासाही पाठवला. पण,जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असं पंकजांनी स्पष्ट केलं.

आघाडी सरकारवर फोडलं खापर

मी एकाही रुपयाचा अपहार केलेला नाही. माझ्यावरच्या आरोपांचं मी खंडन करते. खात्याकडे आलेला एकही रुपया वाया जाऊ नये ही भूमिका मी घेतली. कठोर निर्णय घेतल्याबद्दल, पैसा वाया न घालवल्याबद्दल ही मानहानी होते याची मला खंत वाटते असंही पंकजा म्हणाल्यात. तसंच रेट कॉन्ट्रॅक्टचा निर्णय हा आधीच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या काळात घेण्यात आला होता. 2011 मध्ये 32 कोटींची खरेदी झालेली आहे. मी मंत्री होण्याआधी 408 कोटींची खरेदी झालीये. जर मी मंत्री होण्याअगोदर 408 कोटींची खरेदी झाली असेल तर तो घोटाळा नाही का ? असा सवालही पंकजांनी उपस्थित केला.

निकटवर्तीना कंत्राट दिलेली नाही

प्रत्येक खरेदी ही आवश्यकतेनुसारच केलेली आहे. वॉटर प्युरिफायर प्रकरणात आरोप तर दिशाभूल करणारे आहे. वॉटर फिल्टर प्रकरणात रेट कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे यात कुठलीही भाववाढ झालेली नाही. जगतगुरु संबंधातला विरोधकांचा आरोप हा धादांत खोटा आहे. मी माझ्या कोणत्याही निकटवतीर्ंना कंत्राट दिलेली नाही असंही पंकजांनी नमूद केलं.

'पक्षात एकाकी नाही'

मंगळवारी विनोद तावडेंवर 109 कोटींचं कंत्राट देण्याचा आरोप झाला. काही तासांतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकारांनी हा मुद्दा उपस्थित करून पंकजा मुंडे पक्षात एकाकी पडल्यात का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पंकजांनी आपण पक्षात एकाकी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्या पाठीशी आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच आपली भूमिका मांडलीये. आज पत्रकार परिषद सुरू होण्याअगोदर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती असा खुलासा पंकजांनी केला. तसंच पंकजांनी घटकपक्षाचे नेते रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभारही मानले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close