S M L

ग्रीसमध्ये जल्लोष, बेलआऊट पॅकेज घ्यायला 61 टक्के ग्रीसवासियांचा नकार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 6, 2015 09:29 AM IST

ग्रीसमध्ये जल्लोष, बेलआऊट पॅकेज घ्यायला 61 टक्के ग्रीसवासियांचा नकार

05 जुलै : आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असलेल्या ग्रीसमध्ये सार्वमत घेण्यात आलं. 61 टक्के लोकांनी बेलआऊट पॅकेजच्या विरोधात मतदान केलंय. आणि त्यामुळे बेलआऊट विरोध असणार्‍यांचा जल्लोष सुरू आहे. या निरालामुळे आता युरोपियन महासंघासमोरील अडचणी वाढणार आहेत. रविवारी हे मतदान घेण्यात आले. आधुनिक ग्रीसच्या इतिहासातलं हे सर्वात महत्त्वाचं मतदान समजलं गेलं. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतदान सुरू राहिलं.

ग्रीसचे जवळपास 10 लाख मतदार यामध्ये सहभागी झाले. अखेर युरोपियन महासंघाच्या अटी मान्य करण्याला ग्रीक नागरिकांनी नकार दिला आहे. दरम्यान, या सार्वमताचा परिणाम आशियायी मार्केटमध्ये दिसून आला. आज सकाळी बाजाराच्या सुरवातीलाच युरो घसरला होता.

ग्रीसला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोठे आर्थिक पॅकेज देण्यात आले होते. पण, तो देश आताही अशा पॅकेजची मागणी करत आहे. मात्र हे पॅकेज हवे असेल तर कठोर आर्थिक अटींची पूर्तता करावी लागेल, असा इशारा जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांनी दिला आहे. या देशांनी घातलेल्या अटी मान्य कराव्यात काय, हा प्रश्न लोकांना ग्रीसच्या सरकारने विचारला होता. मात्र 50टक्क्यांहून अधिक लोकांनी या अटी स्वीकारू नयेत, असा कौल दिल्याचे दिसून येत आहे.

अटी स्वीकारल्या नाहीत, तर ग्रीसला युरोपियन महासंघातून बाहेर पडावे लागेल, असा इशारा जर्मनीने दिला होता. त्यामुळे आता ग्रीसबद्दल महासंघ कोणती भूमिका घेतो यावर या देशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

ग्रीसमधल्या निकालाचा अर्थ काय?

 • सार्वमताचा निकाल युरोप विशेषत: जर्मनीविरोधात आहे
 • यामुळे ग्रीस आणि युरोपमधली दरी वाढेल
 • ग्रीसला सर्वाधिक कर्ज दिलेल्या जर्मनीला मोठा धक्का
 • ग्रीस कदाचित युरोझोनमधून किंवा युरोपियन युुनियनमधूनच बाहेर पडेल
 • युरोपियन सेंट्रल बँकेनं पुरवठा बंद केल्यास ग्रीसमधल्या बँका कोलमडतील
 • ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडला तर युरोपियन युनियनच्या स्वप्नाला पहिला मोठा धक्का बसेल
 • ग्रीस पुन्हा स्वत:चं ड्रॅक्मा हे चलन वापरात आणण्याची शक्यता
 • जागतिक बाजारपेठेत युरोची पत घसरण्याची शक्यता
 • ग्रीसमधल्या पर्यटन व्यवसायाला मोठा धक्का बसेल
 • ग्रीसमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल
 • युरोपातल्या मंदीचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर होईल

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close